नागपूर :- इनामदारांचा एक शापित वाडा गावात असतो आणि तो शापित असतो म्हणून गेल्या चारशे वर्षापासून इनामदार कुटुंबिय तो वाडा सोडून शहरात स्थायिक झालेले असतात. प्रत्येक पिढीतील एक व्यक्ती वाड्याचया शापामुळे मृत्यू पावते त्यात नव्या पिढीचा विक्रम हा एकुलता एक मुलगा घाबरलेल्या अवस्थेत आपल्या मित्रांसोबत या वाड्यात येतो आणि या वाड्याचे शापितपण शोधून त्याचा कलंक पुसून टाकतो, या आशयाचे रहस्यनाट्य ‘वाडा’ आज सादर करण्यात आले.
६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेत कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, स्टॉफ असोसिएशन तर्फे हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. या नाटकाचे लेखक अतुल साळवे तर दिग्दर्शन संजय सातफळे यांनी केले होते. ही स्पर्धा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यात विचित्रे ही भूमिका शशांक गाढवे, विक्रम – दत्तात्रय ठाकरे, प्याडी – हर्षल चांदेकर, सनी – विक्रांत मस्के, मंदाकिनी – सोनाली पगारे, रामराव – प्रशांत नागपुरे आणि चंदाची भूमिका ओवी ढवळे हिने केली. या नाटकाचे निर्मिती प्रमुख केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे होते.
मुळात पूर्वी वाडा संस्कृती गावात होती. ती आता नाहीसी झाली आहे. नाटकामुळे ही आठवण ताजी झाली. वाडा संस्कृतीचे व्यापकपण, त्यातला एैसपैसपणा, वाड्याशी संबंधीत काही मिथके आणि रहस्य, गुढपणा सादर करण्यात सर्व कलावंतांचे परिश्रम वाखाणण्यासारखे होते. यातला वारसदार विक्रम हा लेखक असतो आणि त्याची घटनांकडे पाहण्याची दृष्टी जरा वेगळी असते. मंदाकिनी या पात्राभोवताल नाट्य घुटमळते. काही पिढ्यांआधी तिच्या कुरुपतेमुळे ती दुखावली जाते आणि तिचा शापच इनामदार कुटुंबियांना प्रत्येक पिढीत एकाच्या मृत्युने भोगावा लागतो. तो वाडाच शापित आहे, असे गृहित धरून तेथे कुणीच राहात नाही. तेथे खजिना असल्याचेही बोलले जाते. प्रत्यक्षात तो खजिना म्हणजे विक्रमच्या वडिलांची कवितांची डायरी आणि शाप मंदाकिनीच्या अतृप्त आत्म्याचा असतो. पण विक्रम यातून मंदाकिनीच्या अतृप्त आत्म्याला वचन देऊन शापातून नेहमीसाठी स्वत:ची सुटका करून घेतो, असे या रहस्यनाट्याचे कथानक आहे. सर्वच कलावंतानी केलेल्या परिश्रमामुळे नाटकाची भट्टी जमली होती. नाटकाला प्रेक्षकांनी लक्षणीय गर्दी केली होती.
नाटकाला सूचक नेपथ्य संदीप हिवरखेडकर, अनुप मेंढे यांचे सहाय्य सुनिल नंदरधने, सुनिल मेश्राम यांचे होते. प्रकाशयोजना जयंत प्रामाणिक, मिलिंद गवई आणि सहाय्य धीरज कांबळे यांचे होते. संगीत स्वास्तिक चौरसे व सचिन डांगोरे यांचे होते. रंगभूषा व वेषभूषा माधवी जांभूळकर, श्रुती मराठे तर रंगमंच व्यवस्था ओमप्रकाश मडावी, विलास उगे, आश्लेषा राणे, संतोष गतमाने, वैष्णवी वंजाळकर, पंकज घाटोळे, शिला बिडकर यांची होती. या नाटकासाठी केंद्राचे अधिकारी भागेवार, प्रवीण बुटे, मयुर मेंढेकर, महेश घुरिले, दिवाकर देशमुख, ममता वरठे यांनी सहाय्य केले.
कलागुंज बहुऊद्देशिय संस्थेतर्फे आज सादर होणारे लेखिका हे नाटक काही तांत्रिक कारणांमुळे सादर होणार नाही. ते ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सादर होईल.