व्हिजन विकसित भारत@2047: तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात वेग देणारे आहात, सक्रिय व्हा, संधींचा लाभ घ्या आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा

– केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आयएमसी-वायएलएफ युवा परिषद 2024 मध्ये युवा वर्गाला केले संबोधित 

मुंबई :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयएमसी – युवा नेते मंचाच्या (IMC-YLF) चौथ्या युवा परिषदेचे उद्घाटन केले. देश स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे अनुराग सिंग ठाकूर यांनी उद्घाटन सत्रादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारने ‘व्हीजन विकसित भारत@2047: उपक्रम सुरू केला असून या उपक्रमात एक महासत्ता म्हणून भारताची कल्पना केली आहे. भारताला महासत्ता म्हणून स्थापित करण्यात युवा वर्गाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे मंत्रीमहोदयांनी स्पष्ट केले. “युवा वर्गा देशाच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात वेग देणारा आहे, त्यामुळे त्यांनी सक्रिय व्हावे, संधींचा योग्य लाभ करून घ्यावा आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा,” असे सांगत अनुराग सिंग ठाकूर यांनी युवकांना प्रेरित केले.

व्हीजन विकसित भारत@2047: मधील युवा वर्गाच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना अनुराग सिंग ठाकूर यांनी, भारताच्या अतुलनीय क्षमतेवर भर दिला. नियतकालिक श्रमबल सर्वेक्षण 2023 नुसार देशात 547 दशलक्ष व्यक्तींचे कार्यबल उपलब्ध आहे, जे भारताच्या 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी 41% इतके आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

1.4 अब्ज भारतीयांपैकी सुमारे एक अब्ज भारतीय आज 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 2047 पर्यंत सुमारे 21% जागतिक कामगारांचे निवासस्थान भारत असेल, असेही ते म्हणाले. युवा वर्ग हा केवळ भविष्याचा शिल्पकार नसून राष्ट्राच्या आकांक्षा, धोरणे आणि नियतीचेही ते संरक्षक आहेत, यावर ठाकूर यांनी भर दिला.

व्हीजन विकसित भारत’ 2024′ वर चर्चा करताना, इंटरनेट वापरात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असून दर मिनिटाला तीन भारतीय इंटरनेटवर प्रविष्ट होतात आणि त्यापैकी दोन वापरकर्ते खेड्यांमधील असतात, अशी माहिती त्यांनी दिली. 2024 सालापर्यंत जगातील 20% मध्यमवर्ग भारताचा रहिवासी असेल, अशी शक्यता व्यक्त करत, युवा नवउद्योजकांनी गृहनिर्माण, शिक्षण, पायाभूत सुविधा, पाणी, अन्न, आरोग्य आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवनवीन संकल्पनासह सकारात्मकरित्या योगदान द्यावे, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने 17 हजार स्टार्टअप्सना मान्यता दिली असून, गेल्या दशकात 1.3 दशलक्ष नोकऱ्या निर्माण केल्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यापैकी 55,816 स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे, यातून स्टार्टअप आणि महिला सक्षमीकरणासाठी सरकारची वचनबद्धता दिसून येते. 31 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या ‘माय युवा भारत’ व्यासपीठाचाही त्यांनी उल्लेख केला, ज्याने 2024 सालातही देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी भारतीय तरुणांना सक्षम केले.

अनुराग सिंग ठाकूर यांनी भारताला जगातील कंटेंट हब म्हणून स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची ग्वाही दिली. भारताचे उत्कृष्ट मनुष्यबळ, तांत्रिक क्षमता आणि उत्पादनापूर्व आणि उत्पादनपश्चात प्रोत्साहनांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. ओटीटी मंचाचा वार्षिक विकासदर 28% इतका असून भारतीय युवा वर्गाकडे देशाची संस्कृती प्रभावीरित्या प्रदर्शित करण्याची क्षमता आहे. बौद्धिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आणि भारतीय चित्रपट उद्योगाला होणारे 20 हजार कोटींचे वार्षिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा, 2023 करण्यात आल्याचे मंत्र्यांनी अधोरेखित केले.

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष समीर सोमय्या यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी आपल्या भाषणात, देशाच्या विकासात युवा आणि उद्योग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकांवर भर दिला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडचे विशेष प्रकल्प प्रमुख बुर्जिस गोदरेज यांनी ‘व्हिजन विकसीत भारत 2024’ मध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन यांचा समावेश असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी युवा वर्गाला या उपक्रमात, आपल्या कल्पनांचे योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले.

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष संजय मारीवाला यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. देशाच्या विकासासाठी युवा वर्गाला प्रेरित करणारा मंच असणाऱ्या या संमेलनाला देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी उपस्थित राहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोळसा चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

Sat Feb 17 , 2024
– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई कन्हान :- अंतर्गत ०४ किमी अंतरावर टेकाडी रोड कन्हान ता. पारशिवनी येथे दिनांक १५/०२/२०२४ चे ०९.०० वा. ते ०९.१५ वा. दरम्यान फिर्यादी नामे संतोश इंद्रसींग यादव, वय ३८ रा. कामठी कॉलरी क्वा. नं. ५२७ कन्हान हा दि. १५/०२/२४ रोजी ८ ते ४ डयुटीवर हजर असता तेव्हा सकाळी ९.०० वा. दरम्यान माहिती पडले की डब्ल्यूसीएल येथी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!