नागपूर :- प्रत्येक देशाच्या राष्ट्र भाषेप्रमाणे भाषाशैली, उत्तम पोशाख, ध्वजवाहक व देशांचे नामफलक यांचा उत्तम समन्वय साधत नागपूर जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांनी आज अभिरुप जी-20 संमेलनाच्या माध्यमातून विश्वरुप साकारले. भारताचे प्रधानमंत्री, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच युरोपीयन युनियनच्या अध्यक्षांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मन जिंकली.
नागपुरात 20 ते 22 मार्च 2023 दरम्यान जी-20 परिषदेअंतर्गत सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० परिषदेचे आयोजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने अभिरुप जी-20 चे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात आज सकाळी आयोजित या संमेलनास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापती राजकुमार कुसुंबे, सी-20 आयोजन समितीच्या सदस्य डॉ.परिणिता फुके, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपूल जाधव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविंद्र काटोलकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार, नागपूर विद्यापीठाचे प्रा. कडू याशिवाय या उपक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले विविध माध्यमांची प्रतिनिधी उपस्थित होते.
अभिरुप जी-20 संमेलनाची सुरुवात प्रत्येक सदस्य देशाच्या राष्ट्राध्यक्ष/ प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाच्या सभागृहातील आगमनाने झाली. इंग्रजी वर्णमालेनुसार चढत्याक्रमाने जी-20 च्या अर्जेंटिना, आट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा आदी 20 सदस्य देश आणि युरोपीन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने प्रवेश केला. त्या-त्या देशांचे राष्ट्राध्यक्ष/ प्रधानमंत्री यांची हुबेहुब वेशभूषा आणि प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी या देशांची पारंपारिक वेशभूषा साकारलेले विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
राष्ट्राध्यक्षांची दमदार भाषणे
प्रत्येक देशांच्या राष्ट्राध्यक्ष/ प्रधानमंत्र्यांची भाषणे विद्यार्थ्यांनी लिलया पार पाडली. त्या त्या देशांच्या राष्ट्रीय भाषेतून भाषणांची सुरुवात करणारे हे चिमुकले जणू त्या देशांचे संपर्कदूतच वाटत होते. जपान, मॅक्सीको, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि युरोपीन युनियनबाबत जोरकसपणे भूमिका मांडणारे विद्यार्थीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. भूमिका साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करताना त्याची देहकाठी चालल्या बोलण्याची लकब लक्षात घेण्यात आल्यामुळे त्या त्या देशाच्या पेहरावात विद्यार्थी उठून दिसत होते.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष साकारणारा नुतन भारत विद्यालयाचा इयत्ता 11 वीत शिकणारा निखिल झलके याने तर संपूर्ण भाषणच कोरियन भाषेत केले. इयत्ता 9वीत शिकणारा सोमलवार माध्यमिक शाळेचा संस्कार राठोड याने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका उत्तम प्रकारे साकारत आत्मविश्वासपूर्ण देहबोली, शब्दफेक करत केलेले भाषणही उपस्थितांची दाद मिळवून गेले. खुबचंद बजाज शाळेच्या इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या एंजेल मालेवार या विद्यार्थीनीने युरोपीयन इंग्रजी भाषेची स्पष्ट व शैलीदार संवादफेक करत युरोपीय युनीयनच्या अध्यक्षाचे भाषण साकारले.
प्रधानमंत्री मोदींच्या वेशातील आदित्य ठरला केंद्रबिंदू
यावर्षी जी-20 परिषदेचे यजमानपद भारताला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अध्यक्षस्थान मिळाले आहे. अभिरुप जी-20 मध्ये प्रधानमंत्री मोदी साकारणारा रेशीमबाग येथील जामदार माध्यमिक शाळेचा इयत्ता 8 वीत शिकणारा आदित्य डुमरे सर्वांच्या कौतूकास पात्र ठरला. प्रधानमंत्री मोदी यांचा पोशाख, भाषाशैली आणि देहबोलीचा हुबेहुब प्रत्यय आदित्यच्या मंचावरील वावरण्यातून तसेच परिषदेला केलेल्या संबोधनातून आला.
या परिषदेचे औचित्यपूर्ण आणि नेटके सूत्रसंचालन करणारे संचेती पब्लिक स्कुलचे इयत्ता 11वीत शिकणारे दिशांक बजाज आणि श्रृती बागडदेव हे विद्यार्थीही कौतुकास पात्र ठरले.
जी-20 परिषदेविषयी जनजागृती करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने अभिरुप जी-20 संमेलनाची संकल्पना मांडली. यासाठी जिल्ह्यातील दोन शासकीय, चार ग्रामीण, आठ निमशासकीय आणि सहा खाजगी अशा एकूण 20 शाळांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेचे सात विद्यार्थी आणि एका शाळेचे पथसंचलन करणारे दोन असे एकूण 142 विद्यार्थी या अभिरुप जी-20 संमेलनामध्ये सहभागी झाले.
सहभागी शाळांशिवाय या संदर्भातील माहिती आणि प्रसिद्धी प्रत्येक शाळांमध्ये केल्यामुळे शाळकरी वयामध्ये विद्यार्थ्यांना जी-20 परिषदेची माहिती जिल्हाभर होत असल्याचे समाधान यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी व्यक्त केले यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम आणि जनजागृती साठी कौतुक करण्यात आले. या विद्यार्थ्यांना परिषदेसाठी निमंत्रित केले जाणार आहे.