– डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “जय भीम”चा जयघोष करीत हजारो अनुयायी नतमस्तक
नागपूर :- वंचितांना हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करुन पिढ्यानपिढ्यांचे जीवन परिवर्तन करीत आकाश मोकळे करण्याचे काम महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे प्रत्येकाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते वेळोवेळी संविधान बदलण्याची भाषा करतात. मात्र मी जिवंत असेपर्यंत संविधानाचे रक्षण करणार असून गरज पडल्यास प्राणाची आहुती देईल, अशी ग्वाही इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी दिली.
शनिवारी रात्री बारा बाजता संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन ठाकरे यांनी अभिवादन केले. यावेळी ठाकरेंच्या हस्ते भव्य केक कापून सर्व नागरिक आणि अनुयायांना आंबेडकर जयंतीनिमित्य शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबासाहेबांच्या जयघोषात संविधान चौक दुमदुमला. यापूर्वी सकाळी पश्चिम नागपुरात स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बिरसा मुंडा चौक फुटाळा येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर भरतनगर-गोकुळपेठ-हनुमान नगर-मद्रासी मंदिर- छत्तिसगढ मोहल्ला – शिव मंदिर – मुंज बाबा लेआऊट- सुदाम नगरी – हिलटॉप – अंबाझरी – पंचशिल वाचनालय-गांधीनगर स्केटिंग मैदान मार्गे रॅली समाप्त झाली. रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येत नागपूरकर स्वयंफूर्तीने सहभागी झाले होते.