नागपूर :- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा नागपूर विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यातील जाहिरात प्रमाणिकरणासाठी माध्यमे प्रमाणिकरण व संनियंत्रण विभागीय समिती गठीत केली आहे. ही समिती 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत अंमलात राहणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार डॉ. बिदरी यांनी नुकतेच नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सहा सदस्यीय माध्यमे प्रमाणिकरण व संनियंत्रण विभागीय समिती गठीत केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी समितीचे अध्यक्ष असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागाचे संचालक हेमराज बागुल सदस्य सचिव आहेत. विकास आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, सायबर पोलीस नागपूरचे पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, दै. दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अतूल पेठकर आणि दै. हितवादचे कार्तिक लोखंडे हे या समितीचे सदस्य आहेत. माध्यमातील जाहिरात प्रमाणिकरणाची जबाबदारी या समितीवर असणार. निवडणूक कार्यक्रम संपेपर्यंत म्हणजेच 4 फेब्रुवारी, 2023 पर्यंत ही समिती कार्य करणार आहे.