Ø 1 ते 7 ऑगष्ट दरम्यान महसूल दिनांचे आयोजन
Ø युवा संवाद, जनसंवाद, एक हात मदतीचा आदी उपमक्रम
Ø उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
नागपूर :- महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा व योजनांचा लाभ सुलभपणे घेता यावा, तसेच महसूल यंत्रणेबद्दल विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी विभागात येत्या 1 ऑगष्ट पासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. महसूल विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा निहाय नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
महसूल विभागामार्फत दिनांक 1 ते 7 ऑगष्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. नागपूर विभागात जिल्हा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जनतेला शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याच्यादृष्टिने विशेष नियोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 ऑगष्ट हा ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असून विभागीय व जिल्हा स्तरावर ‘महसूल सप्ताहा’ला सुरुवात होणार आहे.
उपक्रमा अंतर्गत 2 ऑगष्ट रोजी ‘युवा संवाद’, 3 ऑगष्ट रोजी ‘एक हात मदतीचा’, 4 ऑगष्ट रोजी ‘जनसंवाद’, 5 ऑगष्ट रोजी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’, दिनांक 6 ऑगष्ट रोजी ‘महसूल संवर्गातील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत संवाद’ तसेच दिनांक 7 ऑगष्ट रोजी महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभामध्ये विभागातील तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान’ करण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, लिपीक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा गौरव करण्यात येणार आहे.
‘महसूल सप्ताहा’मध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम, उपक्रम तसेच ‘महसूल अदालत’ आयोजित करुन प्रशासना संदर्भातील कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येतील. तसेच जिल्हास्तरावर विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा, उपविभाग तसेच तहसिल कार्यालयामध्ये हेल्पडेस्क तयार करुन गरजू नागरिकांना मार्गदर्शन कामासंदर्भात शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टिने विशेष नियोजन राहणार आहे. नागरिकांना या संदर्भात व्हॉट्सॲप संदेशाव्दारे माहिती देण्यात येईल.
शासनाचे महत्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रम धोरणे याबाबतची संपूर्ण माहिती विविध प्रसारमाध्यमांव्दारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गंत तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मुलाखती, व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. विभागीय व जिल्हास्तरावर महसूल विभागांमार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची माहिती तयार करुन नागरिकांना लाभ देण्याच्यादृष्टिने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल सप्ताहा निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.