नागपूर :- नागपूर शहरातील दिव्यांग बांधव आणि भगिनींना आधार देउन त्यांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्याचे बळ मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेचे कार्य सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात समाज विकास विभागाद्वारे दिव्यांगांच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
मनपाच्या योजनांपासून शहरातील कुणीही दिव्यांग बांधव अथवा भगिनी वंचित राहू नये यासाठी त्यांना अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिव्यांगांच्या उत्थानासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे कर्णबधिर दिव्यांगांना शस्त्रक्रिया करिता अर्थसहाय्य योजना, दिव्यांगांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरीता, दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगारा करिता अर्थसहाय्य योजना, मतीमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता योजना, दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक ३, परवडणारी घरकूले अंतर्गत नासुप्र, म्हाडा व मनपातर्फे बांधण्यात आलेल्या व बांधण्यात येत असलेल्या मनपा हद्दीतील बांधकामाकरिता सोडत पद्धतीने निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन अनुदान रु. २.५ लक्ष सह महानगरपालिकेकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांकरिता ५० हजार रुपये अर्थसहाय्य योजना, राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्य योजना, बॅटरी मोटोराईज ट्रायसिकल योजना, दिव्यांग उन्नती पोर्टलवर दिव्यांग नोंदणी विशेष मोहीम कार्यक्रम, नागपूर शहरातील दिव्यांग बालकांसाठी त्यांच्या मातांना अर्थसहाय्य प्रोत्साहन भत्ता देण्याची राजमाता जिजाऊ अर्थसहाय योजना, नागपूर शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत नागपूर शहरी क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ विशेष नोंदणी कक्षाच्या माध्यमातून देण्याची योजना आदी योजना राबविण्यात येत आहेत.
नागपूर शहरातील रहिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तींना नागपूर मनपा मार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग योजनेचा लाभ घेण्याकरिता घरबसल्या अर्ज करता यावा याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. योजनेकरिता आवश्यक कागदपत्राची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिव्यागांचे ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून प्राप्त अर्जाच्या अनुक्रमानुसार योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही मनपाच्या समाज विकास विभागामार्फत करण्यात येत आहे. मनपाच्या संकेतस्थळावर भेट देउन दिव्यांग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज विकास विभागामार्फत करण्यात येत आहे.
दिव्यांग उन्नती पोर्टलवर दिव्यांगनोंदणी करिता www.divyangunnatinagpur.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे देखील आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरातील दिव्यांग बालकांसाठी त्यांच्या मातांना अर्थसहाय्य प्रोत्साहन भत्ता देण्याची राजमाता जिजाऊ अर्थसहाय योजना, नागपूर शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत नागपूर शहरी क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ विशेष नोंदणी कक्षाच्या माध्यमातून देण्याची योजना या योजनांचा लाभ घेण्याकरिता जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसर, नेत्र विभागाच्या बाजूला, हनुमान नगर, नागपूर यांचेशी अथवा ०७१२-२७००९०० या क्रमांकावर संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.