विजेत्यांना आकर्षक रोख पुरस्कार
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशान्वये नागपूर महानगरपालिकेद्वारे समाज विकास विभागाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनाच्या स्वनिधी महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत पथविक्रेते, बचत गट आणि त्यांच्या परिवारासाठी मनपाद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशान्वये १ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान भारतातील ७५ शहरांमध्ये पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता स्वनिधी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. देशातील ७५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील नाशिक, कल्याण-डोंबिवली, मुर्तीजापूर व नागपूर या चार शहरांचा समावेश आहे. त्याअंतर्गत मनपाद्वारे स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी २९ जुलै २०२२ रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये होणार आहे.
या अनुषंगाने पथविक्रेते, बचत गट आणि त्यांच्या परिवारासाठी भजन, गायन, नृत्य, मिमिक्री, नाट्य, वादन, कुकिंग यासह नागपूर शहराच्या माहितीवर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा ऑनलाईन असून भजन, गायन, नृत्य, मिमिक्री, नाट्य, वादन, कुकिंग यासंबंधीचे सादरीकरण दोन मिनिट कालावधीत व्हिडिओ स्वरूपात मनपाला ८०८०५९३५३६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर सोमवार २५ जुलैपूर्वी पाठविणे आवश्यक आहे. यामधून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी शुक्रवारी २९ जुलै रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये घेण्यात येईल. प्रत्येक स्पर्धेत पहिला आणि दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना प्रत्येकी ३००० आणि २००० रुपये प्रथम व द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांनाही रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनाकरिता घेण्यात येणाऱ्या विशेष महोत्सवात शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी परिवारासह सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.