ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात कोविड लसीकरणास गती मिळेल – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास

मुंबई  : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे कोविड प्रतिबंधक लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण प्रयोगास आज सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमामुळे राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणास गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

            या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचविता येईल. यामुळे शीतसाखळी अबाधित राहील. तसेच प्रवासादरम्यान वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

            हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपणाकरिता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे विनाअडथळा व अत्यंत कमी वेळेत सहज शक्य होईल.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून आणि अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपसंचालक, डॉ. गौरी राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी,  माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद चव्हाण, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील तसेच तालुक्यातील वैद्यकिय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशनाच्या कार्यासाठी अधिकचा निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Fri Dec 17 , 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ चा मराठी अनुवादाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन    मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे या मराठी अनुवादित खंडाच्या माध्यमातून त्यांचे विचार ग्रामीण भागातील तरूणांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी भाषेतल्या २२ खंडांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे काम समितीने युद्धपातळीवर करावे. या कामासाठी शासन निधी कमी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com