लसीकरण, चाचणी वाढवा ; उपाययोजनांची दंडात्मक अंमलबजावणी करा: पालकमंत्र्यांचे निर्देश

-उच्चस्तरीय बैठकीनंतर जिल्हावासियांनी स्वयंशिस्तीने कोरोनाशी लढण्याचे आवाहन

-महानगर व शहरालगतच्या 1 ते 8 वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय

            नागपूर,दि.5  :   नागपूर जिल्ह्यात रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे आणि कोरोन प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.

       आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ व टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

     या बैठकीत टास्क फोर्समधील वरिष्ठ वैद्यकीय तज्ञांची मते पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. नागपूरमध्ये सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग, त्याची व्याप्ती आणि प्रसार वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर यावेळी चर्चा करण्यात आली.

            त्यानंतर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून घेतला. महानगरपालिकेतील सद्यस्थितीबाबत आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी माहिती दिली. तर पोलीस विभागासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली.

            तत्पूर्वी मेयो, मेडिकल, एम्सला भेट देऊन आणीबाणीच्या परिस्थितीत नागपूर शहरात उपलब्ध असणारे बेड, ऑक्सीजनचा साठा, औषधांचा साठा, वैद्यकीय मनुष्यबळ याचा आढावा घेतला असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र स्वयंशिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना पाळत प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनन त्यांनी या बैठकीत केले. येणाऱ्या काळात राज्य शासनामार्फतही काही निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेने पूर्ण तयारीनिशी कोरोना लाट वाढणार नाही, यासाठी तयार राहावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

            त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे निर्णय बैठकीत जाहीर केले. उद्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

आजच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

  • कोविड रुग्ण वाढत असल्यामुळे वर्ग 1 ते 8 पर्यंतच्या नागपूर महानगर (खासगी व शासकीय ) तसेच शहरालगतच्या शाळा बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या या संदर्भात अधिकृत आदेश काढले जाणार आहेत.
  •  दंडात्मक कारवाईचा निर्णय अधिक प्रभावी करणार, मास्क न वापरणाऱ्यांवर 500 रुपये दंड.
  •  शाळा, महाविद्यालये, दुकाने, खासगी व सरकारी कार्यालयातील आस्थापनावरील सर्व  अधिकारी, कर्मचारी, कामगारांना दोन लसीच्या मात्रा घेणे अनिवार्य. प्रमुखांनी याची  खातरजमा करावी.
  •  खासगी, सार्वजनिक वाहनात प्रवास करताना मास्क अनिवार्य. अन्यथा दंडात्मक कारवाई  करणार. प्रवास करताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अत्यावश्यक असेल. शहरात  मनपातर्फे ही मोहिम अधिक सक्रीय करणार.
  • सर्व नियंत्रण कक्ष सुरु करणार. तालुक्यापासून शहरातील सर्व नियंत्रण कक्षांना सक्रीय करणार. यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जाईल. माध्यमांनी याला प्रसिध्दी द्यावी.
  • सुपरस्प्रेडरचे लसीकरण झाले याची खातरजमा करणे, त्यांची चाचणी करणे, मास्क  वापरण्याची सक्ती करणे, याबाबत मनपामार्फत कारवाई गतीशील केली जाईल.
  • मंगलकार्यालये, हॉटेल्स, रेस्टारंट यांच्याकडून वारंवार नियमाची पायमल्ली होत असल्यास  त्यांच्यावर कारवाई करण्याचे, दंड वसुलीचे अधिकार पोलिसांना देण्याचा निर्णय घेण्यात  आला.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मनपाची पूर्वतयारी

Wed Jan 5 , 2022
-महापौर राखी संजय कंचर्लावार घेतला आढावा चंद्रपूर, ता. ५ : शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पूर्वतयारी आणि व्यवस्था करण्यासह आवश्यक मनुष्यबळ आणि उपाययोजनांचा आढावा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी घेतला. महापौर कक्षात पार पडलेल्या बैठकीत उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सभागृह नेता देवानंद वाढई यांची उपस्थिती होती. चंद्रपूर शहरात चालू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!