– गिरड सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट
– पिपरा येथील सरपंचांची तक्रार
बेला :- जवळच्या पिपरा ते गिरड सिमेंट रस्त्याचे बांधकामात कंत्राटदाराने रेती ऐवजी डस्ट चुरीचा वापर केला. त्यामुळे रस्ता निकृष्ट होत असल्याची तक्रार पिपरा येथील सरपंच प्रशांत पाहुणे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पिपरा गावाबाहेरील 650 मीटर लांबीचा गिरडकडे जाणारा सिमेंट रस्ता नुकताच अपग्रेडेशन करण्यात आला. त्यामध्ये कंत्राटदाराने रेतीचा वापर न करता ‘ डस्ट ‘ चा वापर केला. त्यामुळे रस्ता निकृष्ट झाला. अशी तक्रार सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
सदर सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी व झालेला रस्ता तोडून नव्याने रेतीचा वापर करून रस्ता बांधकाम करावा. अन्यथा, जन आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा पिपरा ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत पाहुणे यांनी कार्यकारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रकातून दिला आहे. पुढे तो रस्ता गिरडच्या दिशेने २.१५० कि.मी. डांबरी रस्ता होणार असून अंदाजे 2 कोटी किंमतीचे बजेट आहे. रस्त्याचा असाच निकृष्टपणा पुढे कायम राहिला, तर रस्ता लवकरच उध्वस्त होईल. अशी भीती पिपरा येथील नागरिकांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया – गावातील प्रमुख लोकप्रतिनिधी या नात्याने मी 300 मीटरच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ता बांधकामात आक्षेप घेतला असता ,काम न थांबवता कंत्राटदाराने माझ्याशी वादविवाद करून मुजोरीने काम पूर्ण केले. वरिष्ठांनी या निकृष्ट रस्त्याची चौकशी करावी. अन्यथा नाईलाजाने जन आंदोलन करावी लागेल. – प्रशांत पाहुणे सरपंच-पिपरा.