नागपूर :- अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होण्याची गरज आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करा, अशी सूचना नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज येथे आयोजित बैठकीत केली.
राज्यामध्ये जिल्हा तसेच तालुका पातळीवर आढळणा-या अंमली पदार्थांचे सेवन व वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त (उत्तर विभाग) नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग) नीवा जैन, उपायुक्त (गुन्हे शाखा) चिन्मय पंडित यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे विविध विभागाचे सदस्य उपस्थित होते.
डार्कनेट व कुरिअर या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याविषयी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आज नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. ते तंत्रज्ञान आत्मसात करून अंमली पदार्थांचा विळखा रोखण्यासाठी त्याचा वापर सर्वच स्तरावर करण्याची गरज आहे. यासोबतच जनजागृती हा घटकही महत्वपूर्ण असल्याचे अमितेश कुमार यावेळी म्हणाले.