अप्पर वर्धा धरणाने वाजविली धोक्याची घंटा

– अप्पर वर्धा धरणाला 30 वर्षे पूर्ण; सुरक्षेची चिंता वाढली

–  जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांच्या पत्राची दखल

– जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी, धरण सुरक्षा, स्थापत्य मुख्य अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांची धरण स्थळाला भेट 

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा प्रकल्पाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा मोठा प्रकल्प 1978 साली सुरू झाला होता आणि त्याचे धरण 1993 साली पूर्ण झाले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या धरणाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी या धरणाच्या स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारला याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन जलसंपदा विभागाचे धरण सुरक्षा, यांत्रिकी व स्थापत्य असे तीनही मुख्य अभियंता आणि इतर अधिका-यानी धरण स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी धरणावर 12×15 गेट व त्यांचे कार्य व धरणाची इतर तपासणी केली.

जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांनी या धरणाच्या स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करीत सरकारला पत्र दिले. त्यांच्या मते, जर वेळीच उपाययोजना केली गेली नाही तर धरण फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. धरणाच्या वक्रद्वारांवर निर्माण झालेला दाब आणि गंज ही एक प्रमुख चिंता आहे. यामुळे स्टीफनर प्लेट्सवर दाब वाढला आहे आणि टीजी बॉक्सची क्षमता यामुळे कमी झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत धरणाला महापूर आला तर या स्थितीत धरणाला मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या गंभीर मुद्द्याकडे प्रशासनाने गांभीर्य दाखवलेले नव्हते. याबाबतची माहिती एक वर्षापूर्वीच सरकार व प्रशासनाला देण्यात आली होती, परंतु त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने डॉ. महाजन यांनी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना पत्र पाठविले. त्यावर शासनाचे उपसचिव न. गौ. बसेर यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या कार्यकारी संचालकांना पत्र देऊन उचित कारवाई करण्याची सूचना दिली.

त्यानुसार 15 दिवसानी काल दुपारच्या सुमारास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता त्रयी आणि इतर अधिकारी धरण स्थळाला भेट द्यायला आले. भेट देऊन त्यांनी पाहणी केली. त्यांनी धरणावरील गेट, धरणाच्या वक्रद्वारांवर निर्माण झालेला दाब आणि गंजही पाहिला. स्टीफनर प्लेट्सवर वाढलेल्या दाबामुळे असलेला धोका यावर गेट तपासणीचे वेळी चर्चा केली. या गेटचे डिझाईन जलसंपदाची काशी असलेल्या सीडीओच्या माध्यमातून 1986 ला करण्यात आले होते. यानंतर या डिझाईनचा वापर बावनथडी प्रकल्पावर करण्यात आला. मुंबईच्या मध्य वैतरणा धरणात सुद्धा असल्याच गेटचा वापर करण्यात आला असल्याचे कळते. जिगांव प्रकल्पावर याच डिझाईनचे गेट उभारणीचे काम चालू असल्याचे कळते.

अप्पर वर्धा धरणावर निर्णय न घेता हे अभियंते पाहणी दौरा करून परतले. आता आपापल्या कार्यालयात गेल्यावर यावर ते काय निर्णय घेतात, धरणानी वाजविलेली धोक्याची घंटा कधी बंद होईल याकडे अप्पर वर्धा धरण परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. अप्पर वर्धा धरण परिसरातील लोक या धरणाच्या सुरक्षेबद्दल खूप चिंतित आहेत. सध्याच्या धडाधड पडणारा पाऊस पाहता त्यांना भीती वाटते की, जर धरण फुटले तर… आपल्या जीवाला धोका निर्माण होईल का?. या धरणाच्या सुरक्षेसाठी सविस्तर अभ्यास करण्याची आवश्यकता तर आहेच पण त्यांची तातडीने दुरुस्ती या नविन उभारणी, सुधारणा करणे जनतेच्या जीवासाठी महत्वाचे आहे. सरकारने त्वरित निर्णय घेत या धरणाचा आवश्यक तो जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घ्यावे. अन्यथा, या धरणामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे झाल्यास ही जबाबदारी जलसंपदा स्वीकारेल का?

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PSI परीक्षेत ‘महाज्योती’चा अमोल घुटूकडे राज्यात प्रथम

Sun Aug 4 , 2024
– ‘महाज्योती’मार्फत प्रशिक्षण घेतलेले 110 विद्यार्थी होणार फौजदार नागपूर :- दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर करीत आहे. उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर आज 2022 वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या अंतिम निकालात महाज्योतीचा अमोल घुटूकडे याने राज्यात प्रथम स्थान आपल्या नावी केले. राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com