प्र-कुलगुरू डॉ.विजयकुमार चौबे यांनी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धेत विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. प्रभारी कुलगुरू तथा प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी या यशाबद्दल विद्याथ्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. छगनलाल मुलजीभाई कढी महाविद्यालय, परतवाडा येथे 26 ते 28 नोव्हेंबर, 2022 दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रदीप खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद तारे होते. स्पर्धेमध्ये 23 महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी भाग घेतला होता. यावेळी विद्याथ्र्यांनी विविध आसनांचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. स्पर्धेत समीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणनिर्णायक होते. विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील समीर शहा, नितीन वानखडे, आदित्य कनेरी, तुषार चव्हाण, सुमेध तायडे, विशाल राऊत या विद्याथ्र्यांनी विविध आसनांचे अप्रतिम सादरीकरण करुन व्दितीय क्रमांक प्राप्त केला. प्रभारी कुलगुरू तथा प्र-कुलगुरू डॉ.विजयकुमार चौबे, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी सर्व चमूचे अभिनंदन करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या या यशाकरीता विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. योगशास्त्र विषयाच्या समन्वयक प्रा. शुभांगी रवाळे तसेच प्रा. स्वप्निल ईखार, प्रा. स्वप्निल मोरे, प्रा. शिल्पा देवारे, प्रा. प्रफुल्ल गांजरे यांनी वेळोवेळी विद्याथ्र्यांकडून विविध आसन प्रकाराचा सराव करून घेतला.