समता पर्वामध्ये विविध विभागाच्या प्रचार प्रसाराचे नियोजन
नागपूर :- शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रत्येक विभागांनी आपला प्रसिद्धी आराखडा तयार करणे आवश्यक आहे. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रसिद्धी आराखड्याची महत्त्वाची भूमिका असते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी समतापर्व निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
सामाजिक न्याय विभागामार्फत एक एप्रिल ते एक मेपर्यंत समता पर्व निमित्य विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. समता पर्वामध्ये शासकीय योजनांच्या यशस्वीतेमध्ये प्रचार प्रचाराचे महत्व या विषयावर ते बोलत होते. ज्या ज्या विभागामध्ये लाभार्थी आहेत त्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची भूमिका सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी मांडली. सामाजिक न्याय विभागाच्या योजना उद्दिष्टीत गटांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी, माध्यमांचा योग्य वापर, उद्दिष्टित लाभार्थ्यांचे व्यवस्थित आकलन, त्यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाचा अभ्यास आणि लाभार्थ्यांचा प्रतिसाद समजून घेण्याची वृत्ती असेल तर शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यात प्रसिद्धी आराखडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असे प्रतिपादन यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले.
आपल्या विभागाच्या नेमक्या योजना कोणत्या, त्या कोणत्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या, त्यांच्यापर्यंत पोहोचणारी माध्यमे कोणती, त्यांना समजणारी भाषा कोणती हे समजून घेऊन या संदर्भातले नियोजन आवश्यक आहे. उत्तम प्रसिद्धी आराखडा असेल तर योजना अधिक यशस्वी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.