नागपूर :- नायलॉन मांजाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. पोलिसांसह (Police) संबंधित अऩ्य विभागांनी धाडी टाकून कारवाया देखील केल्या. मात्र, त्यानंतरही प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर (Continued use of banned nylon mats) करण्यात येत आहे. नायलॉन मांजाच्या अतिरेकी वापरामुळे मोठ्या धोक्याची शक्यता वर्तविली जात होतीच. ही शंका खरी ठरली. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नको तेच घडले. वडिलांसोबत जात आसताना नायलॉन मांजाने गळा कापल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. वेद साहू असे ११ वर्षीय मुलाचे नाव आहे. वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. अचानक मांजा आला व त्याचा गळा कापला गेला. त्यात तो जखमी झाला होता. आज संक्रांतीच्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला.
गळा कापल्या गेल्याने जखमेने विव्हळत असलेल्या वेदला तातडीने मानकापूर येथील इस्पितळात नेण्यात आले, मात्र, तेथे उपचार झालेच नाही. अखेर रात्री धंतोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखम गंभीर होती व उपचार मिळायला उशीर झाला. अखेर मकरसंक्रांतीच्या सकाळीच त्याचा मृत्यू झाला. हसतखेळत असलेल्या वेदवर डोळ्यासमोर काळाने घाला घातल्याने पालक व नातेवाईक धक्क्यात आहेत.
२४ तासांपूर्वीच धंतोलीत कटलेली पतंग पकडण्याचा नाद एका तेरा वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला. तो पतंग पकडण्यासाठी रेल्वे रुळावर धावत सुटला. त्याच दरम्यान धडधडत आलेल्या रेल्वेगाडीची त्याला जोरदार धडक बसली आणि घटनास्थळावरच त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत कुंभार टोळी परिसरात घडली. वंश प्रवीण धुर्वे असे मृत मुलाचे नाव आहे. वंश हा भिडे हायस्कूलमध्ये सातवीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील प्रवीण हे सुरक्षा रक्षक आहेत. त्याची आईही लोकांच्या घरी काम करते. शुक्रवारी आई-वडील दोघेही कामावर गेले होते. दुपारी तो नेहमीप्रमाणे परिसरातील मुलांसह कुंभार टोलीतील रेल्वे रुळाजवळ खेळत होता. या दरम्यान त्याला एक कटलेली पंतग दिसली. ती पकडण्यासाठी वस्तीतील इतर मुलांसह तो ही धावला. पतंग पकडण्याच्या नादात तो रेल्वे रुळावरून धावू लागला. त्याचवेळी मुंबई-नागपूर लाईनवर धडधडत आलेल्या यशवंतपूर सुपर फास्ट गाडीने त्याला धडक दिली. जागीच वंशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्याच्यासोबतची मुले घाबरली. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच धंतोली पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून वंशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात रवाना केला. धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वंशचा मृत्यूने धुर्वे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.