नागपूर (Nagpur) : पारशिवनी तालुक्यातील कोल वॉशरीच्या विरोधात माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांनीसुद्धा उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांचे एकेकाळचे मित्र आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल एकमेकांसमोर उभे ठाकरणार आहेत.
पारशिवनीत सुरू असलेल्या कोल वॉशरीमुळे सहाशे एकरातील पिके काळी पडली. वॉशरीचे पाणी जमिनीत मुरत असल्याने पाणी प्रदूषित झाले. कोळशाची वाहतूक आणि धुळीमुळे या परिसरातील गावे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल वॉशरी बंद करण्याची नोटीस बजावली होती. तसेच वीज व पाणी पुरवठा कापण्याचेही निर्देश दिले होते. मात्र, पंधरा दिवासतच प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉशरी सुरू करण्यास परवानगी दिली. ती दिल्यानंतर प्रदूषण होणार नाही याची खातरजमासुद्धा केली नाही. आमदार आशिष जयस्वाल यांचा या वॉशरीला पाठिंबा आहे. यामुळे रोजगार उपलब्ध झाला आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असा त्यांचा दावा आहे.
जय जवान जय किसान संघटनेचा या वॉशरीला विरोध आहेत. ते सातत्याने या विरोधात आंदोलन करीत आहेत. मंगळवारी प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसानचे कार्यकर्ते आणि कोल वॉशरीग्रस्त प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धडकले. त्यामुळे अधिकाऱ्यांची फजिती झाली. सुरुवातील अधिकाऱ्यांनी आंदोलनाला सामोरे जाण्याचे टाळले. आंदोलक कार्यालयात धडकतील या भीतीने ते मोर्चाला सामोरे आले. पवार यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर पवार यांनी पुढील सोमवारपर्यंत वॉशरी बंद केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.