नागपूर :- पीएम-कुसुम योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्याना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषीपंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 3,5, 7.5 एच. पी. क्षमतेचे सौर कृषीपंप 90 ते 95 टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत.
सौर कृषीपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनूसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविला जातो. शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास 1 लाख 4 हजार 823 सौर कृषीपंपासाठी मान्यता दिली. असून मान्यतेनूसार महाऊर्जा मार्फत लोकसंख्येनूसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महाऊर्जामार्फत सद्यस्थितीत सुमारे 75 हजार 778 सौर कृषीपंप आस्थापित करण्यात आले आहे.
महाऊर्जाने योजना राबविण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केला आहे. शेतकऱ्यांना योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभर्थी हिस्सा भरण्यासाठी एसएसमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरण्याची व पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.
लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटा एस.एम.एस. प्राप्त झाला असेल तर अशा एस.एम.एस.पासून व त्यामुळे होणाऱ्या फसवणूककीपासून सावध राहण्याचे आवाहन महाऊजामार्फत करण्यात आले आहे.