यवतमाळ :- राज्य गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय एक दिवसीय गोशाळा संचालकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व गोशाळांचे 110 संचालक उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सुर्यवंशी, उद्धव नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सविता राऊत, डॉ. राजेंद्र अलोणे, डॉ. दत्तात्रय झंजाड व जिल्ह्यालील सर्व पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये गोशाळा व्यवस्थापन, गोशाळेतील नोंदी, पंचगव्य उत्पादन, देशी गोवंशीय गायीचे संगोपन व संवर्धन, सर्व रोगांचे प्रतिबंधक लसीकरण या विषयावर तज्ञ वक्त्यांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गोशाळा समृद्ध व मजबुत करण्यासाठी व्यवस्थापन हा विषय डॉ. सुनील सुर्यवंशी यांनी सविस्तरपणे मांडला. तसेच पंचगव्य उत्पादन कसे करावे, याबाबत आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर यांनी मार्गदर्शन केले.
अनुवांशिकता सुधारण्यासाठी प्रक्रिया कशी करावी याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. जया राऊत यांनी संबोधन केले. देशी गोवंशाच्या जातीची ओळख डॉ. दत्तात्रय झंजाड यांनी करून दिली. गोशाळा चारा स्वयंपूर्ण करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. राजरत्न रायबोले यांनी माहिती दिली.