– अमरावती, वर्धा आणि नागपूर येथे विनामूल्य प्रशिक्षण
नागपूर :- शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळण्यासोबतच प्रक्रिया उद्योग स्थापन करून विपणन व्यवस्था निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी मार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून अमरावती, वर्धा आणि नागपूर येथे विनामूल्य प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
राज्यात शेतकऱ्यांद्वारे स्थापित कंपन्यांना शास्त्रोक्त पद्धतीने सक्षम व शाश्वत कंपनी चालविण्याकरिता मार्गदर्शनासाठी सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीने संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यात येते. शेतकरी कंपनीच्या लक्षित गटातील संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रातिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्जदारांनी www.sarthi-maharashtragov. com व www.mahamcdc.com या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. प्रशिक्षणार्थ्यांची निवड मुल्यांकनाद्वारे आणि गुणांक प्राप्त करण्याऱ्या पहिल्या १९२ शेतकरी उत्पादक कंपनीच्या लक्षित गटातून करण्यात येणार आहे. राज्यात नागपूर ,अमरावती,वर्धा, पुणे, नाशिक ,औरंगाबाद आणि दापोली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहकार विकास महामंडळामार्फत दोन वर्ष नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील जास्तीत-जास्त शेतकरी सभासदांनी या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.
शेतमालावरील प्रक्रिया उद्योग वाढण्याबरोबरच शेतमालाचे ब्रँडनेम विकसित करण्यासाठी राज्यात ६ हजार ५०० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. त्यापैकी १ हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये सुमारे २५० पेक्षा जास्त सभासद आहेत. या संस्था अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात यासाठी नाबार्ड , महाराष्ट्र स्पर्धात्मक प्रकल्प व इतर संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते. या कंपन्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शनाची गरज ओळखून सारथी राज्यात प्रशिक्षण योजना राबवित आहे.
‘वनामती’ येथे सारथीचे विभागीय कार्यालय
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथीचे नागपूर येथे विभागीय कार्यालय सुरु करण्यात आले आहे. येथील व्हिआपी रोड धरमपेठ भागातील वनामती परिसरात ‘शरद’ व ‘ग्रीष्म’ या इमारतीत संस्थेचे कार्यालय कार्यरत आहे. नागपूर विभागीय कार्यालयाची जबाबदारी उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपविभागीय अधिकारी हरिष भामरे यांच्याकडे आहे.