शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांचे धडे आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– अभिनेते नाना पाटेकर यांनी खुलवली मुलाखत

नागपूर :- नियम कडक केले, दंड वाढवला, कायदे कठोर केले; पण तरीही अपघात थांबलेले नाहीत. रस्ते अपघातात लोक सातत्याने मृत्यूमुखी पडत आहेत, याची मला खंत आहे. पण येणाऱ्या पिढीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांना धडे मिळायला हवे. त्यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य, एनजीओ या साऱ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.

धरमपेठ येथील वनामती सभागृहात आयोजित रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ना. गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी नानांनी आपल्या दिलखुलास प्रश्नांनी मुलाखत रंगवली. ‘अपघात कमी करू शकलो नाही म्हणून आपण जाहीर खंत व्यक्त केली, पण जनता म्हणून आम्ही कुठे कमी पडतोय?’ असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला. त्यावर ना. गडकरी म्हणाले, ‘देशात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त अपघात होतात. १ लाख ६८ हजार मृत्यू होतात. मृत्यू होणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ वर्षे वयोगटाच्या तरुणांचे ६५ टक्के प्रमाण आहे. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. एखाद्या कुटुंबातील तरुणाचा मृत्यू झाला की त्याच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होत असते.’ यासंदर्भात ना. गडकरी पुढे म्हणाले, ‘अपघात होण्यामागची कारणे शोधून त्यावर आम्ही उपाययोजना करतोय. रोड इंजिनियरिंगमध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ३६०० ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. चारचाकींमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. ट्रकच्या कॅबिनमध्ये एअरकंडीशन अनिवार्य करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील घटनेनंतर बस कोड तयार केला आहे.

जर्मनी, इंग्लंडमध्ये आहेत तशा व्हॉल्वो बस लवकरच भारतातही बघायला मिळतील. याहीपलीकडे सर्वांत महत्त्वाचे आहे ते जनजागृती आणि लोकशिक्षण. अनेक लोक सिग्नलवर थांबत नाहीत, हेल्मेट घालत नाही, मोबाईल कानाला लावून गाडी चालवतात. त्यांना कायद्याची भीती नाही आणि कायद्याबद्दल सन्मानही नाही. समाजाने यात सुधारणा केली तर अपघात नक्कीच कमी होती. मानवी वर्तन बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.’ शाळेत जाणाऱ्या मुलांना एनजीओ, विद्यापीठांनी वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘लोकांनीच आपल्या सुरक्षेचा निर्णय घ्यावा’

वयाच्या साठीनंतर पुन्हा एकदा ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचा नियम करता येईल का?, असा प्रश्न नाना पाटेकर यांनी केला. त्यावर ना. गडकरी म्हणाले, ‘६५ वर्षे वयानंतर लोकांनीच स्वतः ठरवायला हवे की आपले वय झाले आहे, आता आपण गाडी चालवणार नाही. काही लोक ८१व्या वर्षी गाडी चालवतो हे अभिमानाने सांगतात. तर काही लोक वय झाले की स्वतःच गाडी थांबविणे चालवतात. लोकांनी आपल्या सुरक्षेचा निर्णय स्वतःच घ्यावा.’

 ‘जनतेचे सहकार्य आवश्यक’

‘सर्वाधिक अपघात सिग्नल तोडल्यामुळे, रस्ता ओलांडताना, लेन डिसिप्लीन मोडल्याने, ओव्हरटेक करताना होतात. या नियमांचे पालन केले तर बऱ्याच समस्या सुटतील. सतत अपघात होणारे ब्लॅक स्पॉट आम्ही शोधले आहेत. खासदारांचा समावेश असलेली अपघात निवारण समिती स्थापन केली आहे. आम्ही आपल्याकडून सुधारणा करतोच आहे, मात्र जनतेचे सहकार्य देखील आवश्यक आहे,’ अशी अपेक्षाही ना. गडकरी यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 'जाणता राजा' महानाट्याच्या तयारीला वेग

Mon Jan 8 , 2024
– नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस प्रयोग – यशवंत स्टेडियमवर होणार महानाट्य नागपूर :- नागपुरात प्रशासनामार्फत १३, १४ व १५ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यासाठीच्या तयारीला वेग आला असून स्टेजसह इतर तयारीला सुरुवात झाली आहे. यशवंत स्टेडियम परिसरात महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल अशा तयारीला सुरुवात झाली आहे. इतिहासकार शिवशाहीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!