– पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभाग दक्ष
नागपूर :- निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या माध्यमातून सर्वांचा सहभाग असावा, कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक विभागाकडून मतदानवाढीसाठी सर्व माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथी मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३०२ तृतीयपंथी मतदार आहेत. यात सर्वाधिक १०४ मतदार हे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघांतर्गत आहेत.
अंतिम मतदार यादीनुसार तृतीयपंथी मतदारांची शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील संख्या ही २४४ अशी आहे. यात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात २९, नागपूर दक्षिण ८, नागपूर पूर्व ३२, नागपूर मध्य ४०, नागपूर पश्चिम ३१ आणि नागपूर उत्तर मतदारसंघात १०४ अशी एकूण शहरांतर्गत मतदारसंघात २४४ एकूण तृतीयपंथी मतदार आहेत.
ग्रामीण भागातील विधानसभानिहाय मतदारसंघात ५८ तृतीयपंथी मतदार आहेत. यात काटोलमध्ये ६, सावनेर २, हिंगणा २९, उमरेड १, कामठी १८ आणि रामटेकमध्ये २ असे एकूण ५८ मतदार आहेत. जिल्ह्याची एकूण तृतीयपंथी मतदारांची संख्या ही ३०२ इतकी आहे.
प्रत्येक पात्र मतदाराला मतदान करता यावे यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नरत आहे.सर्वसामान्य मतदारांसह दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वीप या उपक्रमांतर्गत जनजागृतीपर विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. तृतीयपंथी मतदारांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.