उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

राष्ट्रीय जंतनाशक दिवसानिमित्त जिल्ह्यात 25 एप्रिल ते 02 मे दरम्यान विशेष मोहिम

1 ते 19 वयोगाटातील एकुण पात्र लाभार्थी 2 लाख 88 हजार

गडचिरोली, (जिमाका) दि.22 : मुलांना परजीवी जंतापासून आजार उद्भवणाचा धोका जास्त असतो. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोटदुखी, भुक मंदावने, अतिसार, शौचामध्ये रक्त पडणे, आतड्यांवर सूज येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जंतनाशक गोळ्या पात्र वयोगटातील सर्व मुलांना देवून मोहिम यशस्वी करा अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी बैठकीत आरोग्य यंत्रणेला दिल्या. या मोहिमेबाबत नियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच महिला व बाल विकास अधिकारी, तसेच मोहिमेत सहभागी इतर अधिकारीही उपस्थित होते.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दिनांक 25 एप्रिल ते 02 मे या कालावधीत जिल्ह्यात वर्षातील पहिली राष्ट्रीय जंतनाशक मोहिम म्हणून आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1 ते 19 वयोगटातील 288625 मुले आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. एकुण पात्र लाभार्थी 288625 यामध्ये 1 ते 6 वयोगटातील अंगणवाडीतील बालके 83047, तसेच 6 ते 10 वर्ष वयोगटातील बालके 62758 तसेच 10 ते 19 वर्ष वयोगटातील बालके 142820 आहेत.
या मोहिमेमध्ये कार्यरत मनुष्यबळ यामधे नोडल शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका मिळून 5969 सहभागी होणार आहेत. यामध्ये अंगणवाडी व मिनी अंगणवाडी 2376, शासकीय अनुदानित शाळा 1735, खाजगी शाळा 343, तांत्रिक संस्था 52 असे एकूण नोडल शिक्षक 2130, आशा-1463 आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण बुथची संख्या ही अंगणवाडी केंद्र व शाळा मिळूण 4506 असून यामध्ये अंगणवाडी व मिनी अंग.-2376 व शाळा 2130 आहेत. तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या उपलब्ध गोळयांची संख्या ही 303056 आहे. औषधाची मात्रा ही पुढीलप्रमाणे असून औषधाचे नाव अल्बेन्डाझोल 400 mg असे आहे व 01 ते 02 वर्ष वयोगटातील बालकांना औषधीची मात्रा ही अर्धी गोळी (अल्बेंडाझोल 200 मि.ग्रॅ.) पावडर करुन व पाण्यात विरघळून पाजावी. 02 ते 03 वर्ष वयोगटातील बालकांना एक गोळी (400 मि.ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून पाजावी.). 03 ते 19 वर्ष वयोगटातील यांना एक गोळी 400 मि.ग्रॅ. चावून खाण्यास लावणे. एक वर्षा पेक्षा कमी वयाच्या बालकांना गोळी दिली जाणार नाही.

जंताचा प्रादुर्भावच होणार नाही याकरीता याप्रमाणे दक्षता घ्यावी- जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे, भाजी व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे, स्वच्छ व उकडलेले पाणी प्यावे, पायात चपला व बुट घालावे, नियमित नखे कापावी, शौचालयाचाच वापर करावा, उघडयावर शौचास बसू नये, परिसर स्वच्छ ठेवावा.

“सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे व पोषण स्थिती उंचावणे हा हेतू आहे. याकरीता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा मधील मुलां-मुलींकरीता जंतनाशक गोळया अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांमार्फत खावू घालणार आहेत. तरी याचा लाभ घेण्यात यावा व या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे”

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.गडचिरोली डॉ.दावल साळवे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जातीय सलोखा जपणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य-तहसिलदार अक्षय पोयाम

Fri Apr 22 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 22:-पोलीस आणि नागरीकात सलोख्याचे संबंध असल्यास अकस्मात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सहजरित्या सोडविता येते.देशद्रोही लोकांचे जातीय षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जातीय सलोखा जपणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.असे मत कामठी चे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी काल 21 एप्रिल ला इमलिबाग मैदान येथे आयोजित रोजा इफ्तार संमेलन कार्यक्रमात व्यक्त केले. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com