– निवडणूकित गावोगावी, घरोघरी भेटी देण्याऐवजी उमेदवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाहीर सभा, ढोल ताशांच्या गजरात बाईक व पायदळ प्रभात फेरीवर आता भर
कोदामेंढी :- राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून जिल्ह्यातील मौदा तालुक्या अंतर्गत कामठी, रामटेक विधानसभा मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भर दिला आहे .२० तारखेला मतदान होणार असून १८ नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडाविणार आहेत. त्यामुळे आता फक्त एक दिवस उरला असून त्या एका दिवसात मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ आणि दमछाक होताना दिसून येत आहे. या विधानसभेच्या मतदानासाठी आता एक दिवस शिल्लक असून, उमेदवाराकडे प्रचारासाठी ही आता केवळ काही तास शिल्लक आहेत. १८ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडविणार आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर, प्रचार सभेवर, ढोल ताशांच्या गजरात बाईक व पदयात्रांसह प्रभात फेरीवरभर देत आहे.
शेवटच्या टप्प्यात उमेदवाराकडून प्रत्यक्ष भेटीसह मोठी गांव, परिसरामध्ये जाहीर सभा घेऊन, एकाच वेळी जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. ४ नोव्हेंबर रोजी माघारी नंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवाराकडून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात करण्यात आली होती. काही उमेदवारांनी तर आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रचाराला सुरुवात केली होती. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांनी प्रचाराची पद्धत बदलवली आहे. सकाळच्या सत्रात शिल्लक गावामध्ये प्रत्यक्ष भेटी तर दुपारी चार नंतर मोठ्या गावांमध्ये जाहीर सभांचे नियोजन करून, एकगठ्ठा मतदारापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे.
उमेदवाराकडून सकाळपासून रात्रीपर्यंत मतदारांच्या दारांच्या गाठीभेटीचे नियोजन केले जात आहे. त्यानंतरही ठराविक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी रात्री उशिराही प्रचाराचे कार्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे विधानसभा सभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. अनेक मतदार संघामध्ये काही गाव पुढारीची काही विद्यमान नेत्यांना किंवा इतर उमेदवाराबाबत नाराजी आहे. आता मतदानासाठीचे दिवस कमी राहिल्यामुळे अशा गाव पुढारीची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्न महायुती सह, महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून केला जात आहे. अनेक पुढाऱ्यांना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या तिकिटाचे आश्वासन दिले जात आहे तर काही पुढाऱ्यांना गावातील कामाचे आश्वासन दिले जात आहे. तर काहीकडून आलेल्या बोलीनुसार मोठी रक्कम ही दिली जात असल्याच्या चर्चा अनेक मतदारसंघांमध्ये रंगल्या आहेत. मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नेत्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघून विजय, पराजयांचे दावे केले जात आहे. त्यात कामठी. मौदा मतदारसंघात दोन्ही उमेदवारात स काट्यांच्या लढत होणार आहेत. तर काही ठिकाणी जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. मतदारांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाही. त्यांच्या मनातील गुपीत कोणीच ओळखू शकत नाही. त्यामुळे नेत्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. २३ नोव्हेंबर रोजी खरे काय ते समजणार आहे.