नागपूर :- 26 जानेवारीला कन्याकुमारी वरून दिल्लीकडे निघालेला संविधान जागृती रथ 14 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर च्या दीक्षाभूमीवर येत आहे. या रथाच्या स्वागतासाठी नागपूरच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संविधान प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन नागपुरातील संविधान जागृती रथयात्रेचे आयोजक उत्तम शेवडे यांनी केले आहे.
15 मार्चला संविधान रथ यात्रा दुपारी 12 वाजता संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाशी राणी चौकातील कांशीरामजी जयंती निमित्त मधुरम सभागृहात आयोजित सभेत कांशीरामजींना अभिवादन केल्यावर मध्य प्रदेशातील शिवनी कडे रवाना होईल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना अंतिम संदेश देताना “प्रगतीचा हा रथ मी मोठ्या कष्टाने इथपर्यंत आणलेला आहे, शक्य असेल तर पुढे न्यावा, शक्य नसल्यास तिथे सोडावा, परंतु याला कदापिही मागे जाऊ देऊ नका” असा संदेश दिला होता.
त्यांचा तो संदेश घेऊन दिल्लीतील अखिल भारतीय आंबेडकर संविधान जागृती ट्रस्ट ने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 26 जानेवारी या गणराज्य दिनापासून संविधान जागृती रथ यात्रेची सुरुवात केली.
हा संविधान रथ तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना आदि राज्यातून फिरत फिरत महाराष्ट्रात पोहोचलेला आहे. येथून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा मार्गे 14 एप्रिल रोजी दिल्लीच्या पार्लमेंट परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ बोट क्लब येथे या रथयात्रेचा समारोप होईल.
या रथाची संकल्पना दिल्लीतील जेष्ठ पत्रकार मुकेश सरकार यांची असून त्यांचे सोबत शिवशंकर हे प्रामुख्याने आहेत.