राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार

राज्यभर 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई :- ‘राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद साधला.मुंबईत २२७ ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, “महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात सुमारे ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून, त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.’’

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय

“प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅथलॅब देखील सुरू करणार

“राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे, तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor Koshyari flags off Mumbai - Dehradun Bicycle Rally for Environment

Mon Oct 3 , 2022
Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari flagged off the Mumbai – Dehradun Bicycle rally started by environmentalist Dr. Anil Prakash Joshi from Raj Bhavan Mumbai on the occasion of Gandhi Jayanti on Sunday (2 Oct). The Governor released the Poster of the Bicycle rally and felicitated the 15 young members of the cycling expedition. Well known film personalities Himani […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com