मुंबई :-भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 30 एप्रिलला असलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज (29 एप्रिल 2023) भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय- ‘एनएफडीसी’ने मुंबईत पेडर रोड इथल्या आपल्या संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमांतर्गत भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ व प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या दोन चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. त्याबरोबरच ‘दादासाहेब फाळके यांचा वारसा’ या विषयावर एका परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताचा पहिला चित्रपट तसेच मूकपट असलेला हा चित्रपट पाहण्याचा एक दुर्मिळ आनंद युवा वर्ग, विद्यार्थी व चित्रपट रसिकांना घेता आला, ज्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. राजा रवी वर्मा यांच्या चित्रांपासून प्रेरित झालेल्या दादासाहेब फाळके यांनी सर्वाधिक प्रसिद्ध पौराणिक कथांपैकी एकावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला, ज्या चित्रपटाला त्या काळात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक यश मिळाले. या चित्रपटाने भारतीय चित्रपट क्षेत्रातील मूकपटांचे युग सुरू झाले. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या आणखी एका प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. परेश मोकाशी यांचा हा चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाच्या निर्मितीची गाथा सांगणारा चित्रपट आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या परेश मोकाशी यांच्या या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळाला
या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर निर्माते व दिग्दर्शक परेश मोकाशी, चित्रपट इतिहासकार व फाळकेंच्या कार्याचे अभ्यासक अमृत गांगर, तसेच चित्रपट विश्लेषक, आशय निर्माते व ‘फेबल्स ऑफ फिल्म’चे संस्थापक अंकित सिन्हा यांनी या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याविषयी चर्चा केली. दादासाहेब फाळके यांचा वारसा, त्यांचे योगदान, भारतीय चित्रपटावर व त्याच्या प्रेक्षकावर त्याचा पडलेला प्रभाव यावर या मान्यवरांनी प्रकाश टाकला. दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर व नात मृदुला पुसाळकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. दादासाहेब फाळके यांची काही दुर्मिळ छायाचित्र, ते वापरत असलेली, नाशिक येथे असलेली गाडी यांसारख्या त्यांच्या दुर्मिळ वस्तूंचे या दोघांनी जतन केले असून तेच या दुर्मिळ वस्तूंचे सांभाळकर्ते आहेत.
“आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी विशेष आहे, कारण आज आपण पाहात असलेल्या चित्रपटांच्या या जादुई दुनियेचा पाया दादासाहेब फाळके यांनी घातला होता. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय- एनएफडीसी येथे भारताच्या चित्रपट इतिहासाचा एक खजिना आहे आणि एक संपूर्ण दालन दादासाहेब फाळके यांना समर्पित करण्यात आले आहे. भारतातील व जगातील प्रत्येक चित्रपटरसिकाने या संग्रहालयाला भेट दिलीच पाहिजे,” असे नामवंत चित्रपटतज्ञ गांगर यांनी सांगितले. भारतीय चित्रपट संग्रहालयाची उभारणी करताना ज्यांची मदत घेण्यात आली त्या सल्लागारांपैकी ते एक आहेत.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा (एनएफडीसी) एक भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्राखाली भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय भारतीय चित्रपटाच्या समृद्ध इतिहासाचे जतन व प्रदर्शन करण्यासाठी पुढाकार घेत आहे. या संग्रहालयाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना चित्रपट निर्मितीची कला व तंत्रज्ञान शिकण्याची संधी जुन्या व आधुनिक चित्रपटनिर्मिती प्रक्रियेच्या संवादात्मक मार्गदर्शनाच्या माध्यमातून देत आहे. मुंबईत पेडर रोड येथे असलेले एनएमआयसी-एनएफडीसी हे भारतीय चित्रपटांचे अग्रणी संग्रहालय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019मध्ये त्याचे उद्घाटन झाले होते.