विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाचा 27 वा दीक्षांत समारंभ थाटात

 नांदेड :- देशातील अनेक नव-तरुणांनी स्टार्टअपद्वारे 1 लक्ष, 10 हजार कोटीहून अधिक किमतीचे उद्योग उभारले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता तर वाढत आहेच. त्याशिवाय रोजगारही निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करून भारताच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी विकसित भारताचे ध्येय्य साध्य करण्यासाठी उद्योजक बनायला पाहिजे, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. भूषण पटवर्धन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, डॉ. संतुक हंबर्डे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत पेशकार, नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एम. मोरे, इंजि.नारायण चौधरी, डॉ. संतराम मुंढे, हनमंत कंधारकर, डॉ. सुरेखा भोसले, सहसंचालक किरणकुमार बोंदर, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणारी विद्यार्थींनी परभणी येथील बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची श्रद्धा हरहरे हिला नांदेड चान्सलर सुवर्ण पदकाने राज्यपालांनी सन्मानित केले.

अध्यक्षीय भाषणात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, संशोधन आणि नाविन्य हे आपल्या केंद्रस्थानी असले पाहिजे. नेतृत्व गुण जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहण्यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. डिजिटल व्यसन ही वृद्ध आणि तरुण दोघांमध्येही वाढणारी समस्या आहे. मोबाईल फोन व इंटरनेट वापरात शिस्त पाळावी. तुमच्या आयुष्यातील स्क्रीन टाईम कमी करावा. विद्यार्थी जीवनात आव्हाने, अडथळे, अपयश येत असतात. याकडे संधी म्हणून पहावे. यश मिळायला उशीर होईल पण यश मिळणार नाही असे होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा गरज असेल तेव्हा आधार घ्या आणि स्वतःचे ध्येय्य पूर्ण करा. एकट्यासाठी जगू नका दुसऱ्यांसाठी जगा, समाजाला परत दिल्याशिवाय शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. देशासाठी संपत्ती निर्माण करा, स्टार्टअप व उद्योजकांचा देश म्हणून देशाला नवी ओळख द्या आणि जीवनात यशस्वी व्हा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन म्हणाले, विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस तुमच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. तुम्ही मिळवलेले ज्ञान हे विशेषाधिकार आणि जबाबदारी दोन्ही आहेत. तुमच्या पुढील जीवन प्रवासाने विद्यापीठाची अखंडता, उत्सुकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे प्रतिबिंब दिसायला हवे. जगात पाऊल ठेवत असताना चांगल्या गोष्टी आत्मसात करा, स्वतःला वाईट व्यसनापासून दूर ठेवा. हे जग तुमच्या तेजस्वीपणाची उत्सुकतेची आणि करुणेची वाट पाहत आहे. पुढे जाऊन सौर्हादाचा वारसा निर्माण कराल, अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाचा अहवाल सादर केला. प्रमुख अतिथींचे दीक्षान्त मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. प्रारंभी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला चंदनहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. पृथ्वीराज तौर व डॉ. योगिनी सातारकर यांनी केले.

या दीक्षान्त समारंभामध्ये 51 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये फसीहा शेख अनुद शेख, प्रीती राजहंस, अक्षता शेळके, नंदिनी बिरादार, प्रतीक्षा टोम्पे, कोमल कापसे, तृप्ती कुलकर्णी, प्रियंका रेवते, सुजाता खटके, काजल मोरे, शिवानी कुलकर्णी, पवन चौधरी, श्रावणी गांधी, वैशाली कीर्तने, शैलेश भुतडा, कामाजी पुयड, व्हूवनेश्वर बुजारे, शिरीन फतिमा परकोटे, आकांक्षा करणे, शुभम मोतीपवळे, सोनाली हिवरे, सुमय्या खाटून, पवन चौधरी, सचिन बनाटे, साक्षी सूर्यवंशी, सरोजा लोळे, काजल मोरे, राजश्री जाधव, प्रियंका देशपांडे, कांचन आवलकोंडे, पृथ पाठक, पूजा गायकवाड, सुधीर सावंत, श्रेया शहाणे, श्रुती राजवाड, शझिया पठाण, अतुल समिंदरा, आकांक्षा करणे, हर्षिता भुतडा, ज्ञानेश्वरी जायभाये, शिवानी कुलकर्णी, शिवकांता पाटील या विद्यार्थ्यांचा समवेश आहे.

दुपारच्या सत्रामध्ये 180 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र दीक्षान्त समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य यांच्यासह संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खते आणि औषधांबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकीग करु नये - कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

Thu Jan 30 , 2025
– बि-बियाणे, खते आणि कीटकनाशकांबाबत नियमांत सुसूत्रता आणणार मुंबई :- बी -बियाणे,खत उत्पादक आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्या व विक्रेते यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बि-बियाणे, खते आणि कीटकनाशक यांची गुणवत्ता तपासणी, केंद्र व राज्यांच्या विविध नियम व धोरणात एकसूत्रता आणण्यात येत असून खत उत्पादक आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्या व विक्रेते यांनी खते आणि औषधे याबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकीग करू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!