नागपूर :- राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलावहिला अर्थसंकल्प असून राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी काय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. राज्यातला शेतकरी फार अडचणीत आहे. त्यांना मदतीची आवश्यकता आहे, शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतुद करण्याची गरज होती. हा अर्थसंकल्प म्हणजे गणितीय आधारावर शिंदे – फडणवीस सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब आहे. अर्थसंकल्पात सवलतींच्या घोषणाची फक्त खैरात करण्यात आली असून ग्रामीण भागाकडे ही दुर्लक्ष केल्याचे राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणालेत.
नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचा मुख्यमंत्र्यांनी दावा केला होता परंतु नाफेडकडून अजूनही कांदा खरेदी सुरू झालेली नाही. कामगारांसाठी सरकार काय करणार आहे? बेरोजगारी, वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा राहणार असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची टीका माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.