– दोन्ही प्रवासी नागपुरचे
नागपूर – आता चोरांनी आपला मोर्चा विदर्भ एक्सप्रेसकडे वळविला असून नागपुरातील दोन प्रवाशांचे लाखो रूपये किंमतीचे दागिने चोरले. प्रवासी साखर झोपेत असताना चक्क दागिने असलेली पर्स लंपास केली. या दोन्ही घटना एकाच डब्यात घडल्या. विशेष म्हणजे वातानुकूलित डब्यात चोरी झाली. एकाचे 10 लाखांचे दागिने तर दुसर्या प्रवाशाचा मोबाईल आणि रोख 600 रूपये चोरले. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
नरेंद्र नगर निवासी फिर्यादी जयमाला डेकाटे (51) लग्नसमारंभा निमीत्त पतीसह ठाण्याला गेल्या होत्या. त्याचे पती केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या कार्यालयात व्यवस्थापक आहेत. नात्यातील लग्न असल्याने दागिने सोबत घेवून गेल्या. मंगळवार 23 ऑगस्ट रोजी त्या मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेसने नागपूरसाठी निघाल्या. कोच ए-3 बर्थ, नंबर 25 वरून त्या प्रवास करीत होत्या. दागिने असलेली छोटी पर्स मोठ्या पिशवीत ठेवली. साखर झोपेत असताना अज्ञात चोरट्याने मोठ्या पिशवीतून दागिने असलेली छोटी पर्स चोरून नेली. यात सोन्याचे मंगळसूत्र, हार, नेकलेस, कानातले, नाकातले असा एकूण 9 लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. सकाळी मुर्तीजापूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबली असता त्यांना जाग आली. जयमाला यांनी पिशवी तपासून पाहिली असता त्यात छोटी पर्स दिसली नाही. त्यांनी डब्यातील प्रवाशांना विचारपूस केली. नंतर टीसीला सांगितले.
दुसरी घटना याच बोगीत घडली. माला गुप्ता (52), रा. उज्ज्वल नगर असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या ए-3 डब्यात बर्थ नंबर 7 वरून प्रवास करीत होत्या. त्यांच्या मोबाईल आणि रोख 600 रूपये चोरून नेले.
बुधवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली असता लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही प्रकरणात तक्रार नोंदवून अकोला पोलिसांकर्ड गुन्हा वर्ग केला.