नागपूर :- गोंदिया जिल्ह्यामध्ये नियतनापेक्षा जास्त कच्चा तांदूळ (सीएमआर) उपलब्ध असल्याने शासनाच्या मान्यतेनुसार अहमदनगर जिल्ह्याला सप्टेंबर महिन्याचे ८६ हजार क्विंटल नियतन पुरविण्यात आलेले आहे. या प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात शासन मान्यतेविना तांदळाची उचल केल्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
धान्य उचलण्याची यापूर्वीच्या तत्कालिन मंत्री आणि सचिवांची संमती देण्यात आली आहे. एफ सी आय संस्था धान्याचा दर्जा, गुणवत्ता तपासतात. त्यामुळे गैरव्यवहार होत असल्याचे दिसून येत नाही. धान्यासाठी पोते आणि सुतळीची खरेदी करण्यात आली. ती योग्य प्रकारची आहे. सुमारे 20 कोटी रुपयांची सुतळी खरेदी केली. या संपूर्ण खर्चाची प्रतिपूर्ती केंद्र सरकार करीत असते. राज्य शासनाने केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती केंद्र सरकार करीत असल्याने चौकशीची गरज नाही, असेही मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
यावेळी सदस्य नानाभाऊ पटोले, ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.