चला ! पर्यावरणस्नेही बनूया ! नदी वाचवू या !
इको फ्रेंडली विसर्जन करावे
तहसीलस्तरावर शांतता बैठकांचे आयोजन
तालुकास्तरावर ऑनलाईन अर्ज पोलीस स्टेशनला करावे
उत्कृष्ट गणेश मंडळास मिळणार बक्षीस
नागपूर :- जिल्ह्यात यंदा गाव असो की शहर नदीच्या पात्रात गणेश विसर्जन करता येणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही नदी किंवा जलस्त्रोतात गणेश विसर्जन करू नये. प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या ठिकाणी कृत्रिम टँकची (इको फ्रेंडली) व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामध्येच गणेश विसर्जन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड, पल्लवी राऊत तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
पोलीस विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशनला एक खिडकी योजना राबवून ऑनलाईन अर्ज स्विकारावे. गणेश मंडळांनी रितसर ऑनलाईन अर्ज पोलीस स्टेशनला करावे. गणेश मंडळाची पोलीस विभागाने नोंद ठेवावी. तहसीलस्तरावर उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करून शांतता व सुव्यवस्था गणेशोत्सव कालावधीत अबाधित राखण्याचे प्रयत्न करावे. गणेशोत्सवादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार या होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.
शासनाने उकृष्ट गणेश मंडळ पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यानुसार राज्यस्तरावर 5 लाख, विभागीय 3 लाख व जिल्हास्तर 1 लाख असे बक्षिस देण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलैच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहे. तसेच अर्जही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत तर तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी भेट देऊन पाहणी करणार आहेत.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असावी. विसर्जनस्थळी एक कर्मचारी ठेवावा. शहर व ग्रामीण अशी नोंद असावी. गणेशोत्सव पूर्व नियोजनासाठी बैठका घेण्याचे आवाहन श्रीमती सौम्या शर्मा यांनी यावेळी केले. ग्रामीण भागात एकूण 1500 गणेशोत्सव मंडळ असून त्याची नोंद ठेवावी. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत काही अनुचित घडू नये यासाठी आयोजकांची महत्वाची भूमिका महत्वाची राहणार असून विद्युत विभागाचा एक कर्मचारी प्रत्येक मिरवणुकीत राहणार आहे. ग्रामस्तरावर याबाबत निर्णय गटविकास अधिकारी यांनी घ्यावे, असे त्यांनी सांगितले. याच कालावधीत ईदचा उत्सव होणार असून पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. पोलीस स्टेशनला गणेशमंडळाचे अर्ज स्विकारतांना त्यांचेकडून मतदार नोंदणी करुन नमूना 6, 7 व 8 भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.