– ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती
– अत्याधुनिक लायटिंगची आवश्यकता
नागपूर :-देशाच्या हृदयस्थानी उपराजधानीच्या नागपूर शहरात अजबबंगला नावाचे एक मध्यवर्ती संग्रहालय आहे. या संग्रहालयात अजब वस्तूंची गजब दुनिया दडलेली आहे. हजारो वर्षांचा इतिहास पर्यटकांच्या ज्ञानात भर घालतो अन् त्या काळातील संस्कृती आणि सभ्यतेचा परिचय करून देतो. मात्र, हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलिकडेच 10 नोव्हेंबर रोजी येथील पाषाण शिल्प दालनात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. वेळीच धावपळ केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अन्यथा मध्यवर्ती संग्रहालयाची राख रांगोळी झाली असती.
दिडशे वर्षे जुन्या संग्रहालयातील इलेक्ट्रिक फीटिंग आणि वायरिंग फार जुनी आहे. त्यामुळे अनेकदा शॉर्ट सर्किट होवून आग लागते. अलिकडेच म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पाषाण शिल्प दालनात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहणे यांनी कर्मचार्यांना फायर एक्टिंगविशर हाताळण्याचे प्रशिक्षण आधीच दिल्याने कर्मचार्यांना आगीवर नियंत्रण मिळविता आले. आग वाढली असती तर संपूर्ण पाषाण शिल्प दालन आणि अजब बंगला जळायला वेळ लागला नसता. मागच्या वर्षी नागपूर हेरिटेज गॅलरीत शॉर्ट सर्किटने आग लागली होती. या दालनात नागपूरशी संबधित इतिहास आहे. त्यापूर्वी सेंट्रल हॉलमध्ये आग लागली होती. याठिकाणी हस्तशिल्प वस्तू आहेत. या चार वर्षात चार ते पाच वेळा शॉर्ट सर्किट होवून आग लागली आहे.
मध्यवर्ती संग्रहालयाची संपूर्ण वायरिंग बदलवून नव्याने इलेक्ट्रिक फीटिंग करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन अभिरक्षक जया वाहणे यांनी शासनाकडे केले. याकामासाठी जवळपास एक कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामाचे इस्टीमेट सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करायचे आहे. वाहणे यांनी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाच्या अधिकार्यांशी कागदोपत्री संपर्क साधला. मात्र, अजूनही इस्टीमेट तयार करून मिळालेले नाही.
…चौकट…
इलेक्ट्रिक वायरिंग फार जुनी
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या धर्तीवर येथील अजब बंगल्यात अत्याधुनिक लायटिंग करण्यात यावी. याठिकाणी पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने लायटिंगचा इफेक्ट पडल्यास प्रेक्षक आणि पर्यटकांना ते अधिक आकर्षित करेल, असा विश्वास मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहणे यांनी व्यक्त केला.
@ फाईल फोटो