इंडियन स्वच्छता लीगमध्ये चंद्रपूर शहराचा सहभाग
शहराच्या टीमचे नाव ‘ हार्ट ऑफ चांदा ‘
चंद्रपूर :- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिके तर्फे १७ सप्टेंबर रोजी ” युथ स्वच्छता रॅलीचे ” आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅली ३ ठिकाणांवरून निघणार असुन रामाळा तलाव, पठाणपुरा दरवाजा, महाकाली मंदिर येथील परीसराची स्वच्छता करून गांधी चौक येथे येणार आहे. रॅलीत स्वयंसेवी संस्था,महिला बचत गट,मनपा अधिकारी कर्मचारी यांच्यासोबतच महाविद्यालयीन युवकांचा मोठया प्रमाणात सहभाग असणार आहे. तिन्ही रॅली गांधी चौक येथे एकत्र येणार असुन स्वच्छतेचा मोठा कार्यक्रम येथे घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना “इंडियन स्वच्छता लीग” हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला असून त्यामध्ये देशातील १८०० हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. या अनुषंगाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये तरूणाईचा सहभाग सर्वाधिक महत्वाचा असणार आहे. यादृष्टीने कचरा विरोधात युवक (Youth V/s Garbage) ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली असून या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे व या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे.
त्यानुसार “ हार्ट ऑफ चांदा ” या नावाने चंद्रपूर शहरातील नागरीकांचा संघ जाहीर करण्यात येत असून टीमचा सदस्य बनण्यासाठी अधिकाधिक युवकांनी (https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) या लिंकवर आपली नोंदणी करून या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.