इंदिरा गांधी जयंतीनिमित्त मार्गदर्शन कार्यशाळा स्वयम् संस्था व माय करिअरचे आयोजन
नागपूर : कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घ्यावे. प्रत्येक अभ्यासघटकाला समान महत्त्व देऊन त्यानुसार तयारी केली तर गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे शक्य होते, असा मूलमंत्र सहायक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हाडगे यांनी युवक-युवतींना दिला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त स्वयम् सामाजिक संस्था व माय करिअर क्लबतर्फे शुक्रवारी (ता. १९) आयोजित पोलीस भरती ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी स्वयम् संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आकरे व शारीरिक चाचणी प्रशिक्षक अभिषेक वैतागे उपस्थित होते.
स्वप्नील हाडगे म्हणाले, पोलीस सेवेत यायचे असेल तर निवडप्रक्रियेचे विविध टप्पे समजून घ्या. केवळ उत्तीर्ण होण्यावर भर न देता सर्वाधिक गुण मिळविण्याचे ध्येय ठेवा. लेखी परीक्षेदरम्यान होणा-या चुका टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. एका निश्चित कालावधीत ध्येय गाठण्याचा संकल्प करा. स्पर्धेला न घाबरता स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून अभ्यासाचे नियोजन करा. शहरी अथवा ग्रामीण पार्श्वभूमीचा निवडीवरवर कोणताच परिणाम होत नसल्याचे हाडगे यांनी सांगितले. अभिषेक वैतागे यांनी मैदानी चाचणीच्या तयारीबाबत टिप्स दिल्या. नियमित व योग्य सराव हाच मैदानी चाचणीत अधिकाधिक गुण घेण्याचा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील प्रश्नपत्रिकांचे अवलोकन करून त्या दृष्टीने अभ्यास केल्यास तयारीत अचूकता येत असल्याचे विक्रम आकरे म्हणाले.
प्रास्ताविकातून विशाल मुत्तेमवार यांनी स्वयम् संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अनेक युवक-युवतींकडे प्रतिभा असते; मात्र योग्य वेळी मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. अशा वेळी होतकरू, गरजू व प्रतिभावान युवक-युवतींनी संस्थेतर्फे सुरू केलेल्या पोलीस भरती ऑनलाईन मार्गदर्शनाची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राहुल खळतकर यांनी संचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी जीवन आंबुडारे, किशोर वाघमारे, सिद्धार्थ सोनारे, विजय पायदलवार, मोहन गवळी व पायल भेंडे यांनी सहकार्य केले.