नागपूर : ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून कौटुंबिक किंवा अन्य हिंसाचाराने पीडित महिला, संकटग्रस्त महिलांना सामाजिक आधार मिळत आहे. नागपूर शहरात कार्यरत या सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गगार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी आज जागतिक महिला दिन संमलेनात काढले. राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग, विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालय आणि सखी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त येथील शासकीय करूणा महिला वसतीगृहात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी पांडे बोलत होत्या. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी सविता माळी, सामाजिक कार्यकर्त्या शैल जैमिनी, प्रियंका पेटल् हार्ट फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. प्रियंका सिंग, भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या संचालिका हर्षदा पुरेकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा प्रभारी विभागीय उपआयुक्त अपर्णा कोल्हे उपस्थित होत्या .
गडचिरोली सारख्या दुर्गम भागात अजूनही महिला व अल्पवयीन मुलींना समाजात सन्मानाने उभे राहण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पोषक वातावरण पोहचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य शासनाच्या स्वाधार गृहामुळे या महिलांना हक्काचा आधार मिळत आहे. मोबाईल ,इंटरनेट आदी संपर्क साधणांच्या सहज उपलब्धतेमुळे बालमनावर विपरीत परिणाम होत आहे. याची वेळीच दखल घेत शाळांमधून मुलांना कायद्याचे शिक्षण देण्यात यावे ,असे पांडे यावेळी म्हणाल्या .
शैल जमिनी म्हणाल्या, वर्तमान स्थितीमध्ये नव कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करत स्त्री-पुरूष समानेतचा विचार होणे आवश्यक आहे. स्त्री पुरुष असा भेद दूर करून समाजात महिलांना भयमुक्त वातावरण जगता यावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना,उपक्रमांच्या माध्यमातून यादिशेने उत्तम कार्य होत आहे. नागपूर शसहरातही सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून महिलांना सहकार्य होत असून त्यांच्यासाठी सुरक्षीत वातावरण निर्माण होत आहे.
याप्रसंगी छाया राऊत, डॉ.प्रियंका सिंग यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा कोल्हे यांनी केले तर सूत्र संचालन अनघा मोघे यांनी केले राहाणे यांनी आभार मानले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर
सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्या करणाऱ्या संस्था व व्यक्तींना यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर करण्यात आले. वर्ष 2014 – 15 चा विभाग स्तरावरील पुरस्कार रेशीमबाग येथील सरस्वती मंदिरास जाहीर झाला आहे. विभागस्तरावरील व्यक्तीगत पुरस्कार सरस्वती मंदिरच्या अध्यक्षा शैलजा सुभेदार आणि सचिव शुभदा आंबेकर यांना जाहीर झाला आहे. जिल्हा स्तरावरील पुरस्कारांमध्ये वर्ष 2013 – 14 चा पुरस्कार डॉ.लता देशमुख, वर्ष 2014-15 जयश्री पेंढारकर, 2015-16 डॉ.रेखा बाराहाते, वर्ष 2016-17 चा डॉ.प्रेमा चोपडे, वर्ष 2017-18 चा सुरेखा बोरकुटे, वर्ष 2019-20 चा ॲड स्मिता सरोदे सिंगलकर यांना जाहीर झाला असून या सर्वांचे यावेळी गुलाबाचे रोपटे देवून अभिनंदन करण्यात आले.
येत्या काळात समारंभपूर्वक हे पुरस्कार वितरीत करण्यात येतील.