नागपूर :- केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या लेंडी सरोवर/तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास नोव्हेंबर 2022 मध्ये प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली असून 14.13 कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पाचे सध्या पुनरुज्जीविताचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली
नागपूर शहरातील ऐतिहासिक लेंडी तलाव पुनर्जीवित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रविण दटके यांनी सहभाग घेतला होता.
नागपूर महानगरपालिकेमार्फत या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवून मे. आदित्य कन्सट्रक्शन कंपनी यांना दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी कार्यादेश देण्यात आलेले असून प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तलावातील गाळ काढण्याचे उद्देशाने उन्हाळ्यात तलाव रिक्त करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. परंतु पावसाळ्यात तलाव रिक्त करण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले. सद्यःस्थितीत तलाव रिक्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाचे आजमितीस कोणतेही देयक कंत्राटदारास देण्यात आलेले नसल्याने प्रकल्पावर खर्च निरंक असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या लेंडी सरोवर पुनर्जीवन प्रकल्पाच्या केंद्र व राज्य हिश्यापोटीच्या प्रथम हप्त्याच्या रुपये 1.412 कोटी किमतीची पतमर्यादा देण्यात आलेली असून सदर निधी खर्च झाल्यानंतर पुढील हप्त्याच्या निधीची पतमर्यादा नागपूर महापालिकेस उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.