मराठी भाषेचा मधुर स्वाद नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई :-मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचा मधुर स्वाद नव्या पिढीपुढे पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २४) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

जन्मापासून लहान मुलांना इंग्रजी भाषा शिकविण्याचा पालकांचा अट्टाहास योग्य नाही. लहान मुलांना सुरुवातीला मातृभाषा आत्मसात करू द्यावी व त्यानंतर त्यांना इंग्रजीच नाही तर जर्मन, फ़्रेंच व इतर कुठलीही भाषा शिकणे शिकणे अवघड जाणार नाही. मराठी भाषा ही शिकण्यास सोपी असल्याचे आपण अनुभवातून सांगू शकतो असे नमूद करून आपण सार्वजनिक कार्यक्रमात आणि विशेषतः राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये दीक्षांत समारोह व इतर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मराठीतून करण्याबाबत आग्रही राहिलो असे राज्यपालांनी सांगितले.

भाषांचा एक कालखंड असतो. एकेकाळी प्रचलित असलेली ग्रीक भाषा आज नाममात्र शिल्लक आहे. परंतु भारतीय भाषा प्रवाही आहेत असे सांगून उज्वल भवितव्यासाठी वर्तमान काळात जगताना आपला वैभवशाली भूतकाळ स्मरणात ठेवणे गरजेचे ठरते आणि यासाठी भाषा जिवंत असणे महत्वाचे ठरते असे त्यांनी सांगितले. 

‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या नाट्यकृतीमध्ये सातवाहन काळ, संत ज्ञानेश्वरांचा काळ, दक्षिण कर्नाटकातील राजांचा काळ येथपासून मराठी भाषेचा चांगला आढावा घेतला असून या नाट्याचे अधिकाधिक प्रयोग शाळा व महाविद्यालयांमधून व्हावे जेणेकरून मातृभाषेप्रती सार्थ अभिमान जागरूक होईल असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने आपण विद्यापीठे व महाविद्यालयांना नाट्यप्रयोगासाठी शिफारस करू असे सांगताना राज्यपालांनी नाटकाला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

मधुरा वेलणकर, अभिजित साटम व डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांसह मराठी साहित्य, नाट्य व चित्रपट विश्वातील कलाकार व रसिक प्रेक्षक उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय मतदार दिन-2023, लोकशाहीत प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य - श्रीकांत देशपांडे

Thu Jan 26 , 2023
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार  मुंबई : “लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो”, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!