– ब्लॅक बेल्ट परीक्षा, कराटे प्रशिक्षण
– जपान येथील गुरूंच्या उपस्थितीत दीक्षाभूमीत कार्यक्रम
नागपूर :- कराटेत पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांनी जपान येथील गुरूंच्या उपस्थितीत दीक्षाभूमीच्या क्रिकेट अकादमीच्या सभागृहात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तासभर चाललेल्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांची प्रत्येक कृती पाहण्यासारखी होती. त्यांची तीक्ष्ण नजर आणि चपळता उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाला कराटेत उंच शिखर गाठलेल्या जपानच्या गुरूंची विशेष उपस्थिती होती.
शोरिंजी रियू टेकीसुई कायकान कराटे दो ऑफ इंडियातर्फे आयोजित कार्यक्रमाला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, जपानचे गुरू ईचिदो मात्सुओ, मिचिया नांबा, नानारी मात्सुओ, मिका नांबा, महाविद्यालयाच्या प्राचार्या मेहेरे, उपप्राचार्य अरविंद जोशी, झाकीर खान यांच्यासह संस्थेचे सहसचिव (सिहान) ब्रिजेश प्रसाद, उपाध्यक्ष राहुल तेलंग, सचिव आनंद वासनिक उपस्थित होते.
तत्पूर्वी रामटेक येथील नागार्जुन विहारात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. तीन दिवस चाललेल्या शिबिरानंतर परीक्षा घेण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना जपानी गुरूंच्या हस्ते ब्लॅक बेल्ट देण्यात आले. या प्रशिक्षाण शिबिराचा लाभ संस्थेचे माजी विद्यार्थी राजेश राऊत, अनिल तेलंग यांच्यासह शंभरावर विद्यार्थ्यांनी घेतला.
शोरिंजी रियू टेकीसुई कराटे दो ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष भदंत ससाई आहेत. त्यांनी कराटे विद्येत अत्युच्च शिखर गाठले आहे. 45 वर्षांपूर्वी उपराजधानीतील अनेक युवकांना त्यांनी कराटेचे प्रशिक्षण दिले आणि पुढील प्रशिक्षणासाठी जपानला पाठविले. त्यापैकी सिहान राहुल तेलंग, संजय महाजन, राजेश नागदिवे, ब्रिजेश प्रसाद हे आहेत. संचालन संस्थेचे सचिव (सिहान) आनंद वासनिक यांनी, तर आभार जोशी यांनी मानले.
रिकाम्या हातांनी शिकण्याची कला : ससाई
कर म्हणजे हात, टे म्हणजे रिकामे. रिकाम्या हातांनी शिकण्याची कला म्हणजे कराटे. विद्यार्थ्यांनी युनिफार्म घालून नियमित सराव केल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होऊन उद्दिष्ट साध्य होते. कराटेमध्ये काथा याला फार महत्त्व आहे. काथा म्हणजे एकरूप होऊन विविध प्रकारचे स्टंट सादर करणे. या कलेचा उपयोग स्वरक्षणासाठी होतो, असे ससाई म्हणाले.