पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते.
पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अत्यंत जिव्हाळ्याने आणि उत्साहाने स्वागत केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत-अमेरिकेचे संबंध भारतीय अमेरिकन समुदायाने अतिशय मोठ्या प्रमाणात समृद्ध केले असून, हे संबंध दोन महान लोकशाहींमधील संबंध वृद्धिंगत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पंतप्रधानांनी आदल्या दिवशी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्यासोबत त्यांच्या डेलावेर येथील घरी झालेल्या भेटीची माहिती दिली. हे विशेष आदरातिथ्य भारतीय समुदायाने अमेरिकेसोबत बांधलेल्या विश्वासाच्या सेतूचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.
2047 पर्यंत विकसित भारत करण्याच्या दृष्टीकोनाविषयी पंतप्रधानांनी आपले विचार व्यक्त केले. मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेने त्यांना ऐतिहासिक तिसरा कार्यकाळ दिला असून, या काळात ते भारताच्या प्रगतीसाठी अधिक जास्त समर्पित भावनेने काम करण्यासाठी वचनबद्ध झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी गेल्या दशकात भारतात झालेल्या परिवर्तनात्मक बदलांना म्हणजेच पुढच्या पिढीतील पायाभूत सुविधांच्या निर्मितीपासून ते 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यापर्यंत झालेले बदल, भारताची आर्थिक वृद्धी आणि 10व्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपासून 5व्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था बनणे आणि आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य यांना अधोरेखित केले.
जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सुधारणांचा पाठपुरावा करत राहण्याची सरकारची बांधिलकी पंतप्रधानांनी अधोरेखित केली. नवोन्मेष, उद्योजकता, स्टार्ट अप्स, आर्थिक समावेशन आणि डिजिटल सक्षमीकरणाचा प्रभाव या विकास आणि समृद्धीला चालना देणाऱ्या देशातील नव्या सचेतन वातावरणाचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी महिला प्रणीत विकास आणि हरित संक्रमणाचा तळागाळातील स्तरावर होत असलेल्या परिवर्तनकारक परिणामांना अधोरेखित केले.
जागतिक विकास, समृद्धी, शांतता आणि सुरक्षा, हवामान बदल प्रतिबंधक उपाययोजना, नवोन्मेष, पुरवठा आणि मूल्य साखळी आणि जागतिक कौशल्य-तफावत भरून काढण्यात भारताचे मोठे योगदान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताचा आवाज आज जागतिक स्तरावर अधिक जास्त खोलवर पोहोचू लागला आहे आणि बुलंद झाला आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी अमेरिकेत बोस्टन आणि लॉस एंजेलिस येथे दोन नवीन भारतीय दूतावास आणि ह्यूस्टन विद्यापीठात तमिळ अभ्यासाचे तिरुवल्लुवर अध्यासन सुरू करण्याच्या योजना जाहीर केल्या. या उपक्रमांमुळे भारत आणि अमेरिकेतील भारतीय समुदाय यांच्यातील जिवंत सेतू आणखी मजबूत होईल. भारतीय समुदाय, त्यांच्या मजबूत संयोजन सामर्थ्यासह, भारत आणि अमेरिका यांच्यातील घनिष्ठ संबंध वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.