सांस्कृतिक मेजवानीने रंगणार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा

– फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्सचाही समावेश

– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार भव्यदिव्य शुभारंभ

चंद्रपूर :- ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ हे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. यासाठी ना. मुनगंटीवार यांनी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करून घेतले आहे. उद्घाटन सोहळा सांस्कृतिक मेजवानीचे रंगणार असून स्पर्धेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन खेळाडूंना घडणार आहे.

27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

शुभारंभ समारंभात फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण राहणार आहे. 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बल्लारपूर येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूर व बल्लारपूर नगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. विविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीयस्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज झाली आहे.

शाल्मली खोलगडे गाणार ‘लाइव्ह’

मुख्य उद्घाटन सोहळ्यात 27 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध सिनेगायिका शाल्मली खेालगडे यांचा लाइव्ह संगीत परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच फायर शो, लेझर शो, अक्रोबाईट डान्स आणि ढोल ताशांचा गजर करण्यात येणार आहे.

एक शाम खिलाडीयों के नाम’

28 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता गीत आणि नृत्याचा समावेश असलेल्या ‘एक शाम खिलाडीयों के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पार्श्वगायक मोरेश्वर निस्ताने, श्रुती जैन (सूर नवा ध्यास नवा फेम), स्वस्तिका ठाकूर (कलर्स रायजिंग फेम) व सागर मधुमटके, संगीत संयोजन पंकज सिंग व नृत्य दिग्दर्शन सचिन डोंगरे हे कलाकार सहभागी होतील.

शिववंदना, महाराष्ट्राची लोकधाराही वेधणार लक्ष

महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा, शिववंदना व महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम 29 डिसेंबरला सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. यात सुमारे 300 लोककलावंत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राची विविध संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. गणेशवंदना, जागर गोंधळ, शाहिरी, भक्ती-शक्ती संगम, कोळी नृत्य व शिवराज्यभिषेक सोहळ्याचे सादरीकरण यावेळी उपस्थिताना पाहता येईल.

कलर्स ऑफ इंडिया’चीही क्रेझ

30 डिसेंबरला 350 कलाकार देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. भव्यदिव्य स्वरूपात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘थीम साँग’ तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी स्वर दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर… खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर…’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज हे या ‘थीम साँग’ची वैशिष्ट्य ठरत आहे. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि आमिर खान यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा संदेश प्रसारीत केले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक संपन्न

Tue Dec 26 , 2023
मुंबई :- महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे झाली. या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषी मंत्री मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मंत्री मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सदस्य डॉ. विवेक दामले, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com