संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली इंटरनेट, सॅटेलाईट ,मोबाईल ,खाजगी दूरचित्रवाहिन्या यासारख्या यंत्रामध्ये क्रांती झालेली आहे.यामुळे आज एखादा नवीन चित्रपट रिलीज झाला की प्रक्षेपणाची स्पर्धा लागते तर दुरचित्रवाहिन्यांमध्येही चित्रपट दाखविणाऱ्या चॅनल्सचीही संख्या वाढत आहे.नवीन चित्रपटांची प्रिंट सोशल मीडिया तसेच बाजारात सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे चित्रपटगृहाकडे पटेक्षकांची संख्या रोडावत आहे.तर आठ दहा वर्षपुर्वीचे हाऊसफुल चे फलक क्वचितच चित्रपट गृहाकडे झळकल्याचे दिसते.
मागिल दहा बारा वर्षांपूर्वीच्या वर्षात एखादा नविन चित्रपट आला की तो चित्रपट पाहण्याकरिता तिकीट बॉक्स वर मोठी गर्दी व्हायची.ही गर्दी बरेच दिवस असायची कारण त्याकाळी मनोरंजनाची साधनांचा प्रसार म्हणावा तितक्या प्रमाणात नव्हता.सिनेमाप्रेमी एखादा चित्रपट इतक्या वेळा पाहीला हे अभिमानाने चार चौघात सांगायचे.फर्स्ट डे फर्स्ट शो साठी तुडुंब गर्दी चित्रपटगृहावर व्हायची यामुळे चित्रपटगृहांची तिकिटे काळ्याबाजारानेही मोठ्या प्रमाणात विकली जायची.सुटीच्या दिवशी लोक थिएटर सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत असत .चित्रपटाच्या तिकिटाचे दरही मर्यादित असायचे मात्र आज विज्ञानाने इतकी गरुड भरारी घेतली आहे की ,सॅटेलाईट ,मोबाईल,विविध खाजगी दूरचित्रवाहिन्या,पेनड्राइव्ह ,कितीही मोठ्या प्रमाणात बसणारा डाटा,कम्प्युटर ,इंटरनेट आदींच्या विविध सुविधामुळे घरबसल्या हवा तो चित्रपट पहावयास मिळतो आहे.याशिवाय धकाधकीच्या टेन्शनमय जीवनात थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहण्यास तीन तास कोण वाया घालवणार ?अशाही प्रतिक्रिया अनेक जण व्यक्त करीत आहेत.त्यामुळे मात्र चित्रपटगृहाकडे प्रेक्षक पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे मात्र अजूनही हौशी चित्रपट रसिक या सर्व कारणांनी सबब न सांगता चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून चित्रपटगृहकडे वळतात मात्र ही संख्याही जास्त नाही. पूर्वीसारखे चांगले चित्रपट आज बहुधा तयार होत नाही. चित्रपटांची तेच तेच कथानक ,बहुतांशी प्रमाणात चित्रपटांमधील धागडधिंगा यामुळे चित्रपटात हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांची अश्लील विधाने,टवाळक्या यामुळे कुटुंबाचे एकत्र पाहावेत अशी परिस्थिती बहुतांशी ठिकाणी चित्रपटगृहात दिसत नाही.
याचबरोबर महागाईने अनेकांच्या खिशाला कात्री आणि तिकिटांचे वाढलेले दर,चित्रपटगृहात दाखवली जाणारी बोल्ड दृश्ये,इत्यादी कारणामुळे प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहाकडे पाठ फिरवीत आहे.हे मात्र नक्की तर पुरुष हा एकटा चित्रपट पाहू शकतो मात्र स्त्रीही एकटी चित्रपट पाहू शकत नाही .तिला आपल्या कुटुंबा बरोबरच चित्रपट पहावयाचा असतो मात्र पोटाच्या मागे लागलेल्या घरातील प्रत्येकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे एकत्र कुटुंबाने चित्रपट पाहण्याचा मेळ बसत नाही.