– मतदार नोंदणी अभियानाबाबत महाविद्यालयीन प्रतिनिधींशी बैठक
नागपूर :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन युवा इन’ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 हजार नवमतदारांची नोंदणी करावयाची आहे. त्यासोबतच 17 वर्षांवरील विद्यार्थ्यांची नोंदणीसुध्दा यावेळी करण्यात येणार आहे. पुर्वी वर्षातून एकदा मतदार नोंदणी होत असे; परंतु आता वर्षातून चारदा मतदार नोंदणी होत आहे. यामुळे 17 वर्षावरील मुले 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबरच मतदार होत मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. अशा उपक्रमामुळे देशाचे भविष्य असलेल्या नवमतदारांच्या नोंदणीत वाढ होऊन लोकशाही बळकटीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी सांगितले.
प्रत्येक महाविद्यालयात प्रत्येक वर्गात दोन ॲम्बिसिडर (मुलगी व मुलगा ) करायचे आहेत. यासोबतच वर्गात एक मॉनिटर व वर्गशिक्षक नोडल अधिकारी असणार आहेत. महाविद्यालयांनी ॲम्बिसिडर, मॅानिटर आणि नोडल अधिकारी यांच्या नावांची यादी दूरध्वनी क्रमांकासह संबंधित तहसिलदारांकडे द्यावीत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
मतदार नोंदणीसाठी चार ऑनलाईन मार्ग असून व्हीएचए ॲप, NVDP.IN, CEO.MAHARASHTRA.IN व VOTERS ECI.IN आहेत. सोबतच बीएलओद्वारे ऑफलाईन नोंदणी करण्यात येत असून इपिक कार्ड, आधार कार्ड, जन्म दाखला, रहिवासी दाखला आदी कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक असून नमुना क्रमांक 6 हाच मतदार नोंदणीसाठी नमुना असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी सांगितले.
विशेष पुनरिक्षण कार्याक्रमांतर्गत मतदार नोंदणी अभियान ‘मिशन युवा इन’ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात राबविण्यात येत आहे. याबाबत सर्व महाविद्यालयाच्या प्रतिनिधीची बैठक उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रविण महिरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली. यावेळी पुर्व नागपूर विधानसभेचे मतदार नोंदणी अधिकारी अभिमन्यु बोदवड, दक्षिण पश्चिम विधानसभेचे मतदार नोंदणी अधिकारी हरिष भामरे, तहसीलदार संतोष खांडरे, स्नेहलता पाटील, नायब तहसीलदार ताराचंद कावडकर, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते.