भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या पाच दिवसाच्या महासंस्कृतीक महोत्सवात व्यावसायिक कलाकारांसोबतच स्थानिक कलावंतांच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल भंडाराकरांनी प्रथम च अनुभवली दरम्यान दिनांक २९ जानेवारी २०२४ ला भंडाऱ्यातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या असर फाउंडेशन च्या कलाकारांनी “रयतेचा राजा” ही नृत्यनाट्य कलाकृती ७० गुणी कलाकारांसह सादर केले.
तत्कालीन परिस्थिती वर आधारित “जाणता राजा” नाटक भांडारेकरांनी तिथेच बघितले पण सत्य परिस्थितीतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन परिस्थितीतील तफावत असरच्या कलावंतांनी अतिशय धाडसाने प्रेक्षकांपर्यंत पोहचवले. जयंती पुण्यतिथींना महापुरुषांना आठवून उपयोग नाही, यात्रा भोजन दान देऊन उपयोग नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनातून घराघरातून पोचवणे आवश्यक आहे. हा विचार विविध प्रसंगांच्या माध्यमातून रयतेचा राजा या नाटकातून कलावंतांनी सादर केला.
मुलांना लागलेले मोबाईलचे वेड, मादक व्यसन आदि विषयांवर अतिशय मार्मिक शब्दात कलावंतांनी पटवुन दिले. घोषणा देऊन उपयोग नाही तर घराघरातुन निष्ठावंत कणखर आणि स्त्रियांचा मान, सन्मान ठेवणारा मावळा तयार होणे गरजेचे आहे. “रयतेचा राजा” नाटकाची संकल्पना दिग्दर्शन असर फाउंडेशनची असून मागील सहा वर्षांपासून प्रत्येक शिवजयंतीला या नाटकाचे सादरीकरण ग्रामीण भागात करून खऱ्या अर्थाने जनप्रबोधनाचा कार्य असर फाउंडेशन करीत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेले विक्रम फडके, रायबाच्या भूमिकेत असलेले वैभव कोलते व बाल कलाकार शौर्य तिघरे नाटकात सूत्रधाराची भूमिका करत नाटकाचे एक एक पैलू उलगडण्याचे कार्य करतात तर राजमाता जिजाऊच्या भूमिकेतील प्रियांका कोलते, शेतकऱ्याच्या भूमिकेत दिपक तिघरे आणि तरुणी च्या भूमिकेत असलेली वैदेही हाडगे सोबतच संपूर्ण कलाकृतीला कलेद्वारे न्याय देणारे शाम तायवाडे, आयुष बांते, हर्षल कुंभारे, कुणाल माने, शुभम बरवैय्या, सौरभ सोनवणे, वैष्णवी सोनटक्के, तनुश्री माहुरकर, मनाली मर्जीवे, स्मृती सुखदेवे, प्राची बागडे, साक्षी दिघोरे, ज्योती मेश्राम, ज्योती घोनमोडे., स्वाती बागडे, अल्का झुरमुरे शैलधी कोलते, पवित्रा कोलते, शांभवी तिघेरे, सुरेंद्र कुलरकर, वृषभ राघोर्ते आदी कलाकार जीव ओतून काम केले.