बेला :- शारदीय नवरात्र उत्सवाचे निमित्ताने बेला येथील तत्कालीन गोंडराजे व भोसलेकालीन शंभर ते दीडशे वर्ष पुरातन मोठी आई , गंजी माता, पाती माता व लहान माता मायेचे मंदिरात प्रथा परंपरेनुसार घटस्थापना करण्यात आली असून पहिल्या दिवसापासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
गावाबाहेरील बोरगाव (लांबट)चे रस्त्यावरील पुरातन मोठ्या आईच्या मंदिराचा यंदा जीर्णोद्धार झाला असून तेथे ‘भव्य दिव्य सुंदर ‘ मंदिर साकारले आहे.भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याने तिचेवर अपार श्रद्धा असणारे गावातील असंख्य भक्तगण पहाटेच्या आरती, प्रसादाला हजेरी लावून देवीचे मनोभावे दर्शन घेत आहे. यामध्ये असंख्य महिलाचा विशेषत्वाने सहभाग असतो. त्यामुळे बेला येथे मोठ्या आईची मोठी महिमा पहायला मिळते. इतरही पुरातन मंदिरात पहाटेच्या आरती व पूजा, अर्चनाला असंख्य भक्तांची तोबा गर्दी होत आहे. पशु चिकित्सालया मागील पुरातन गंजी माता मंदिरातही आसपासचे नागरिक नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करत आहे.
ढीवर पुऱ्यात पुरातन लहान माता मंदिर आहे. तेथे रामदास दुर्गे, चैत्राम शेंडे, संजय शेंडे,वरघने कुटुंबीय आणि मोहल्यातील नागरिक मोठ्या भक्ती भावाने नवरात्र उत्सव साजरा करीत आहे. येथे देवीची पुरातन व पारंपारिक आरती होते. हे विशेष. जुन्या गाव शिवे वरील प्राचीन पाती मातेवरही गावातील भक्तांची अढळ श्रद्धा दिसून येत आहे. येथे अशोक नकले, गोपाल तांबेकर, प्रकाश तांबेकर यांचे पुढाकारात मोहल्ल्यातील नागरिक उत्साहात नवरात्र साजरी करत आहे. पोलीस ठाण्यामागील ठाणेदार बंगल्यासमोरील लक्ष्मी माता मंदिरातही श्रद्धापूर्वक नवरात्र उत्सवाचा जागर सुरू आहे. येणाऱ्या विजयादशमी पर्यंत येथे दररोज धार्मिक व चैतन्याचे मंगलमय उत्साही वातावरण दिसून येईल.त्यासाठी ठिकठिकाणी भजन, पूजन, आरती नित्यनेमाने सुरू असून महाप्रसादाचे तयारीला कार्यकर्ते लागले आहेत.