– मोटारसायकल चालक जखमी
– बोखारा रेल्वे क्रासिंगवरील घटना
– लोकोपायलट, गेटमॅन विरूध्द गुन्हा दाखल
नागपूर :-रेल्वे फाटक उघडताच वाहतूक सुरू झाली. सर्वांनाच घाई असल्याने वाहने काढण्यात सारेच मग्न होते. अचानक मालगाडी मागे येताच क्रासिंगवरील वाहनचालकांची आरडा ओरड सुरू झाली. काहींनी जीव मुठीत घेवून पळ काढला. या घटनेत मोटारसायकल चालक जखमी झाला. तर एका कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. सुदैवाने जीवीत हानी टळली. हा थरार बोखारा रेल्वे क्रासिंगवर घडला. या प्रकरणी फिर्यादी अमोल घरमारे (35), रा. हुडकेश्वर यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी मालगाडीचे लोकोपायलट आणि गेट मॅन विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
गुमथाळा येथे राहणार्या सासर्याला सोडून अमोल हुडकेश्वरला घरी परत येत होता. दरम्यान बोखाला रेल्वे मार्गाने मालगाडी जाणार असल्याने गेटमॅनने रेल्वे गेट बंद केला. त्यामुळे गेटच्या अलिकडे आणि पलिकडे वाहनांच्या रांगा लागल्या. काही वेळातच मालगाडी धड धड करत निघाली. दोन किमी दुर गेल्यानंतर गेट मॅनने गेट उघडला. थांबलेले वाहन भराभरा निघू लागले. सर्वांनाच घाई असल्याने वाहन काढण्यात सारेच व्यस्त होते. अचानक एक मालगाडी रिव्हर्स आली. याकडे मात्र, कोणाचेही लक्ष नव्हते. मागे वाहनांच्या रांगा असल्याने अमोलला हलता आले नाही. जीव वाचविण्यासाठी त्याने बाहेर उडी घेतली. मालगाडीची धडक त्याच्या कारला बसली. कारच्या समोरील भाग संपूर्ण तुटला. दरम्यान मोटारसायकल चालक अक्षय कोठे (30), रा. झिंगाबाई टाकळी हा जखमी झाला. जखमी अक्षयवर जवळच्या खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. माहिती मिळताच रेल्वे अधिकारी कर्मचार्यांसह आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची तक्रार करण्यासाठी अमोल कोराडी पोलिस ठाण्यात गेला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोकोपायलट आणि गेटमॅन विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
@ फाईल फोटो