– तिरंगा ट्रिब्युट,तिरंगा मेला व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा
चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त यांनी सांगितले की,या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प घ्यावा व त्यादृष्टीने आपले योगदान निश्चित करावे.राष्ट्रध्वजाचे महत्व सर्वांच्या मनात अधोरेखित करण्याच्या दृष्टीने देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात आली असुन अभियान अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ध्वज वाटप,बाईक रॅली,हुतात्म्यांना अभिवादन,भव्य तिरंगा यात्रा,तिरंगा सेल्फी स्पर्धा, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला,तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध उपक्रम मनपातर्फे राबविण्यात आले.
याप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्र देण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत प्रियदर्शिनी सभागृह येथे १४ ऑगस्ट रोजी तिरंगा ट्रिब्युट उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. शेषराव बळीराम इंगोले,स्व.कृष्णराव हजारे यांच्या वतीने राजेंद्र हजारे व स्व.लक्ष्मणराव काहीलकर यांच्या वतीने विठाबाई काहीलकर यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रमही साजरा करण्यात आला.यात व्यावसायिक चमू व मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांद्वारे बहारदार गाण्यांचे प्रस्तुतीकरण करण्यात आले. नृत्यांगण नृत्य शाळेद्वारे उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्राजक्ता उपरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या जयोस्तुते,माता महांकाली या नृत्य व शिवाजी महाराज यांच्या लढ्याविषयी माहिती देणाऱ्या नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
१५ ऑगस्ट रोजी मनपा वाहनतळ येथे तिरंगा मेलाचे आयोजन करण्यात आले होते. महिला बचतगटाद्वारे शोभेच्या सजावटीच्या वस्तु,जन्माष्टमीसाठी आवश्यक वस्तु,मातीचे भांडे,घरगुती वस्तु तसेच खाद्यपदार्थांचे असे विविध १४ स्टॉल्स येथे लावण्यात आले होते.पावसाचा अडथळा असला तरी नागरिकांनी स्टॉल्सवर बरीच गर्दी केली होती.
या सर्व कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले, सहायक संचालक नगर रचना सुनील दहीकर, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता विजय बोरीकर,उपअभियंता रवींद्र हजारे,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे,संतोष गर्गेलवार,सचिन माकोडे यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.