मुंबई :- पुराभिलेख संचालनालयाकडून दुर्मिळ व ऐतिहासिक कागदपत्रांच्या जतन व संवर्धनाचे महत्त्वाचे काम करण्यात येते. या कामासाठी पुराभिलेख संचालनालयाची एलफिस्टन महाविद्यालयातील जागा अपुरी पडत आहे. दुर्मिळ व ऐतिहासिक कागदपत्रांचा महत्त्वाचा ठेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील पुराभिलेख संचालनालयाच्या ६ हजार ६९१ चौरस मीटर जागेवर सुसज्ज असे महापुराभिलेख भवन उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले, या प्रस्तावित महापुराभिलेख भवनमध्ये तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी कक्ष, प्रती चित्रण शाखा, देश-विदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी संशोधन कक्ष, प्रदर्शन दालन असणार आहे. पुराभिलेख संचालनालय १८२१ पासून कार्यरत असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
पुराभिलेख संचालनालयाकडे १७.५० कोटी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. त्यापैकी १० कोटी ५० हजार कागदपत्रे मुंबईत आहेत. सन १८८९ पासून एलफिस्टन महाविद्यालयाच्या इमारतीत या कागदपत्रांच्या जतन व संवर्धनाचे काम अव्याहतपणे सुरू आहे. मात्र जागेअभावी या कागदपत्रांचे जतन व संवर्धनावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे शासन महापुराभिलेख भवन उभारत आहे, असेही शेलार यांनी सांगितले.