नागपूर :- कुठलाही कलावंत हा हरफनमौला असतो. तो त्याच्या स्वतंत्र बेटावर त्याची कलानिर्मिती करत असतो, त्यामुळेच इतर माणसांना तो वेगळा वाटतो. मुळात तो वेगळा असतोच. कधी कधी तो स्वत:चे नातेसंबंध सुद्धा अशा वेगळ्या स्वभावामुळे टिकवू शकत नाही. इतरांपासून फटकून वागतो पण एखाद्या व्यक्तीशी अर्थात त्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीशी त्याचे कदाचित चांगले जमते. अशाच आशयाचे भावनाट्य आज सोमवारी सादर करण्यात आले.
६३ वी राज्य नाट्य स्पर्धा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे सुरू आहे. या स्पर्धेत इरफान मुजावर लिखित आणि महेंद्र राऊत दिग्दर्शित ‘पूर्णविराम’ हे दोन अंकी नाटक आज सादर करण्यात आले. या नाटकाचे निर्मिती प्रमुख औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडाचे मुख्य अभियंता विजय राठोड होते. यात मनोहरची भूमिका सुरज खोके, अनिता – प्राची दाणी, माधवी – रूपाली बोंबाटे, लक्की – प्रसाद चौधरी तर ब्रदरची भूमिका भूषण दाणी यांनी केली. सर्वच कलावंतांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. मनोहर, माधवी आणि अनिता हे पात्र विशेषत्त्वाने प्रेक्षकांना भावणारे होते.
नाटकाची सहनिर्मिती प्रमुख नारायण राठोड, सुदीप राणे, विराज चौधरी यांनी केली. सूचक व नेटके नेपथ्य भूषण दाणी आणि अनुप मेंढे यांचे तर सहाय्य नरेंद्र चंदनकर, बाळू ओगटे, पांडुरंग नखाते, बागेश्वर मांढरे यांचे होते. प्रकाश योजना आशिष नाचणे आणि अजय करंडे यांनी केली. काही प्रसंगात मात्र प्रकाशयोजना चुकीच्या पद्धतीने झाली. अनेकदा कलावंत अंधारात अभिनय करत होते. संगीत शंकर बोरसे, नितेश लांजेवार, मारुती भोज, शशिकांत पाटील यांनी दिले होते. संगीत अतिशय चांगले व विचारपूर्वक दिले होते. विशेषत: काही प्रसंगात गीत आणि गझलचा योग्य उपयोग केल्याने परिणामकारकता अधिक वाढली, यात वाद नाही. रंगभूषा आणि वेशभूषा प्रिया खोके, स्वाती चौधरी यांची होती. रंगमंच व्यवस्था सारंग देशमुख आणि संतोष उनोणे यांनी पाहिली. नाटकासाठी विशेष सहाय्य संदीप देवगडे, विश्वास सोमकुंवर, आनंद वाघमारे यांनी केले.
कलावंत हा मनस्वी असतो. कलावंताची कला पहावी, त्याच्या आयुष्यामध्ये डोकावू नये, असे म्हणतात. कलावंताचा कलंदर जगणं सर्वसामान्य व्यक्तीसाठी वेगळे असते. कलावंत पूर्णत्वाच्या शोधात असतो. या शोधामध्ये त्याच्यासोबत असणाºया व्यक्तींची वाटचाल कधी सुखावह ठरते तर कधी त्यांचीही फरफट होते. पुरुष कलावंतांची पत्नी होणं हे तर एक दिव्यच. कलावंत कधी विक्षिप्तपणे वागतो तर कधी अट्टाहासाने आपलेच म्हणणे खरे करतो व बहुतांश वेळा यासोबत येते व्यसनाधीनता. कलंदर आयुष्य जगतांना हे जगराहाटी, समाजनियमांची तमा हे बाळगत नाहीत. यामुळेच कलावंत काळाच्या पुढे जाऊन या जगाची कल्पना मांडत असतात. जगण्याचे नवे आयाम शोधत असतात. कळत नकळत याचा परिणाम मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वच व्यक्तींवर होतो. बहुतांश वेळा कलाकाराचं आयुष्य हे फक्त कलेला न्याय देऊ शकतं, त्याच्या आयुष्यातील व्यक्तींना नाही. हे विदारक सत्य स्विकारताना कलावंताला आणि त्याच्या आयुष्यातील व्यक्तींना दु:खाला सामोरे जावे लागते.
मनोहर हा चित्रकार आपल्या कलेला समर्पित असणारा कलावंत. चित्रांच्या व चित्रकलेच्या माध्यमातून नाविन्याचा शोध घेणे हे त्याचे वैशिष्ट्य. अनिता त्याची सहचारिणी, सर्वसामान्य स्त्री लग्न झाल्यावर नवºयाकडून ज्या अपेक्षा ठेवत असते त्या पूर्ण न झालेली… पण मनोहर वरती निस्सीम प्रेम करणारी. अनिताची चित्रकलेमधील समज खूप कमी आहे. हे तिचे अपूर्णत्व मनोहर ला सलत असते. माधवी मनोहर ची मैत्रीण, अनिता मधील अपूर्णत्व तो माधवी मध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. माधवी प्रतिथयश लेखिका आणि मनोहर च्या कलाप्रवासाची सोबती. मनोहरच्या कलंदरपणाची, बेदरकार जगण्याची आणि त्याच्या कलाविश्वातील जगण्याशी एकरूप झालेली. माधवीने सर्वाथार्ने मनोहर ला स्वीकारलेले असते. मनोहर ला कॅन्सर झालेला आहे. तो कुठल्याही उपचाराला प्रतिसाद देत नाही, हॉस्पिटलमध्ये मनोहर मृत्यशय्येवर असतांना अनिता आणि माधवी यांच्यातील वैचारिक आणि तात्विक मंथन म्हणजे पूर्णविराम…!