नागपूर :- जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वनहक्क दाव्यांचे ठेवण्यात आलेले सर्वच 48 अपील विभागीय आयुक्त तथा विभागीय वन हक्क समितीच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज निकाली काढण्यात आले.
बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय वनहक्क समितीच्या बैठकीत तीन पिढी पुरावा आणि वन विभागाच्या जमिनीवरील 2005 पूर्वीच्या अतिक्रमण पुरावा व इतर पुरावे जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेले गडचिरोली जिल्ह्यातील 45 तर चंद्रपूर जिल्ह्यातील 3 अपील ठेवण्यात आले. हे सर्व अपील निकाली काढण्यात आले.
अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर तथा समितीचे सदस्य सचिव रविंद्र ठाकरे, समितीचे सदस्य मुख्य वनसंरक्षक गडचिरोली एस. रमेश कुमार, अपर आयुक्त आदिवासी कार्यालय नागपूरचे वरिष्ठ निरीक्षक मिलींद भगत, सहायक आयुक्त भूसुधार शिल्पा सोनुले आणि समितीचे अशासकीय सदस्य सुधाकर कुळमेथे यावेळी उपस्थित होते. विभागीय वनहक्क समितीस प्राप्त एकूण 56 अपिलांपैकी 48 अपीलकर्ते उपस्थित होते. हे सर्वच अपील निकाली काढण्यात आले असून उर्वरित 8 ही गडचिरोली जिल्ह्यातील अपील पुढील बैठकीत निकाली काढण्यात येणार आहेत.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 अंतर्गत जिल्हास्तरीय वन हक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वन हक्क दाव्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यासाठी सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानूसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वन हक्क समितीची स्थापना करण्यात आली आहे.